संमेलनात घुमले ‘अधिकार’वाणीचे सूर!
By admin | Published: February 20, 2016 03:33 AM2016-02-20T03:33:53+5:302016-02-20T03:33:53+5:30
नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष फय्याज यांनी अध्यक्षपदाला अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, तर नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हे पद एका वर्षापुरते शोभेचे असता कामा नये,
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगरी (ठाणे) : नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष फय्याज यांनी अध्यक्षपदाला अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, तर नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हे पद एका वर्षापुरते शोभेचे असता कामा नये, असा सूर आळवला. मात्र अधिकार हे मागून मिळत नाहीत, तर ते गाजवायचे असतात, अशा शब्दांत उद्घाटक व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभयतांना ‘अधिकार’वाणीचा मंत्र दिला.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९६व्या नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारलेल्या भव्य स्वर्गीय मामा पेंडसे मंचावर संपन्न झाला. तत्पूर्वी लेखक श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून निघालेली नाट्यदिंडी गडकरी रंगायतनमार्गे स्टेडियमवर पोहोचली. गवाणकर यांना फय्याज यांनी सूत्रे सोपवताना अध्यक्षांचा गळ्यातील पदक आणि पुणेरी पगडी प्रदान केली.
त्यानंतर फय्याज म्हणाल्या, की संमेलनाध्यक्ष हा १० दिवसांच्या गणपतीप्रमाणेच असतो. संमेलनानंतर त्याला काही अधिकार नसतो. शासनाचे दोन पुरस्कार निवडण्याचे अधिकार सोडले तर हे पद केवळ शोभेचे असते, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे मला वर्षभर काहीही करता आले नाही. हे पद किमान दोन वर्षेतरी असावे, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
उद्धव ठाकरे यांनी संमेलनाध्यक्षपद दोन वर्षे करण्याची मागणी मान्य आहे का, असा सवाल जाहीरपणे मोहन जोशी यांना करताच, त्यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले. मात्र असा झटपट निर्णय अशक्य असल्याची कुजबुज लागलीच सुरू झाली.
> नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद हे उभ्या नाट्यसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारे असते, असे मी मानतो. केवळ एका वर्षापुरते शोभेचे ते असता कामा नये. एक वर्षात नियोजित संकल्प पूर्णपणे आकाराला येतातच, असे नाही़ परंतु कुठेतरी सुरुवात निश्चित होईल. राज्य सरकार व नाट्यपरिषदेने संमेलनाध्यक्षांच्या ‘भटकंती’स सुसह्य होईल, अशी व्यवस्था केल्यास देशभरातील नाट्यचळवळींशी संवाद साधणे शक्य होईल.
- गंगाराम गवाणकर, संमेलनाध्यक्ष
> अधिकार गाजवायचे असतात -उद्धव ठाकरे
सध्या महापौरपद
अडीच वर्षे आहे. त्या पदावर बसणारे अनेक जण मला अधिकार नाहीत व पुरेसा कालावधी मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करतात. पण माझे असे मत आहे, की अधिकार असे मागून मिळत नाहीत, ते गाजवायचे असतात. फय्याजताई,
मोहन जोशी इथेच बसले आहेत. अजून काही करून घ्यायचे असेल तर सांगा, अशी टिप्पणी ठाकरे यांनी करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.