‘झोडप’धार!

By admin | Published: June 26, 2017 02:56 AM2017-06-26T02:56:52+5:302017-06-26T02:56:52+5:30

आगमनानंतर पाठ फिरवणाऱ्या मान्सूनच्या पावसाने शनिवारी रात्री दमदार पुनरागमन करत, मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे

'Swap'! | ‘झोडप’धार!

‘झोडप’धार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ठाणे : आगमनानंतर पाठ फिरवणाऱ्या मान्सूनच्या पावसाने शनिवारी रात्री दमदार पुनरागमन करत, मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या ‘झोडप’धार पावसाचा जोर रविवारी दुपारपर्यंत कायम राहिल्याने, मुंबईत दादर येथील हिंदमाता, माटुंगा येथील गांधीमार्केट आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, शीतल सिग्नल आणि कमानी सिग्नलसह मालाड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. तर ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये एकूण १२३९.३० मिमी पाऊस पडला असून, त्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे कळवा स्थानकादरम्यान रुळांवर पाणी तुंबल्याने सकाळी रेल्वे वाहतुकीला लेटमार्क बसला. त्यात ठाकुर्ली येथे गर्डर बसविण्यासाठी रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.
पश्चिम उपनगरातही मालाड सबवेमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावरही कुर्ला डेपो, शीतल सिग्नल आणि कमानी सिग्नल येथे पाण्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला होता. अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथेही साचलेल्या पाण्यामुळे अंधेरीसह कुर्ला आणि घाटकोपर आणि पवईकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
ऐन रविवारी पडलेल्या मान्सून सरींचा आनंद लुटण्यासाठी मुंबईच्या समुद्र किनारी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. समुद्राला दुपारी आलेल्या भरतीदरम्यान चार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. नरिमन पॉइंट, गिरगाव, वरळी, दादरसह जुहू येथे मोठया प्रमाणावर झालेल्या गर्दीला थोपविण्यासाठी पोलीस आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. पावसाचा जोर दुपारी ओसरला असला तरी रविवारी सकाळी झालेली गर्दी सायंकाळपर्यंत कायम राहिल्याने मुंबईकरांनी मान्सून मूड द्विगुणित केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
ठाण्यात शहापूरच्या नडगांव-डोंगरीपाडा येथील कल्पना वाघ व अर्चना वाघ यांच्या अंगावर वीज पडून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर ठाण्यात उपचार सुरू आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, टिटवाळा, भिवंडी, मीरा-भार्इंदर, भिवंडी या शहरांत आणि मुरबाड-शहापूर तालुक्यात पावसामुळे सखल भाग जलमय झाले. सोसायट्यांसह चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने प्रशासनाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
ठाण्यात कोपरीचे १२ बंगला, मयुर बिल्ंिडग, राबोडी व वृंदावन सोसायटीत पावसाचे पाणी शिरले. कल्याण तालुक्यातील मौजे बल्यानी येथील चाळींमध्ये, तर अंबरनाथच्या कमलाकरनगरमध्ये पावसाचे पाणी शिरले. उल्हासनगरच्या सीएचएम कॉलेजजवळ झाड पडले.
रायगडमध्ये रविवारीही सकाळपासूनच पावासाने तुफान हजेरी लावल्याने काही क्षणांमध्ये अलिबाग शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. सकाळपासून पाऊस सुरु असल्याने अलिबागच्या मुख्य बाजार पेठेत शुकशुकाट होता.
सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. पाचपदरी महामार्गावरील सुमारे ३ पदरी रस्ता पाण्यात गेल्याने पुन्हा एकदा सायन-पनवेल महामार्गाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. १५०० कोटी रु पये खर्चूनही या महामार्गावर पाण्याचा निचरा योग्यरीत्या होत नसल्याने चालकांनी नाराजी व्यक्त केली.
दोन महिला जखमी
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मुलुंड येथील राहुल नगरमधील घराची भिंत कोसळल्याने सुशीला सोनवणे, रंजीता कांबळे या दोन महिला जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
१४ ठिकाणी शॉर्टसर्किट
शहरात १, पूर्व उपनगरात ४ अशा एकूण ५ ठिकाणी घरांचा काही भाग पडला. शहरात ७, पश्चिम उपनगरात ७ एकूण १४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. याची माहिती संबंधित विभागांसह वीज पुरवठा यंत्रणांना देण्यात आल्याचे महापालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
४८ ठिकाणी झाडे पडली
शहरात १०, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात २६ अशा एकूण ४८ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही.
बेस्ट मार्गात बदल
पावसाचे पाणी साचल्याने दहिसर सबवे, मागाठाणे येथील येथील बेस्टची वाहतूक सकाळी ७ ते ८ यावेळेत पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. मालाड पश्चिम येथील साईनाथ सबवे येथील वाहतूक सकाळी ८ ते ९ यावेळेत पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती.


भिवंडीत २०५ मिमी पाऊस
ठाण्यात मागील वर्षी २५ जूनला पडलेल्या पावसाच्या तुलनेत रविवारी सरासरी ४० मिमी. जादा पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस भिवंडीत २०५ मिमी पडला. ठाण्यात २०४ मिमी, कल्याणला १५१, मुरबाडला १५३, उल्हासनगरला १७३, अंबरनाथला १६३.३० व शहापूरला १९० मिमी पाऊस पडला. 
रायगडमध्ये धरणांत पाणीसाठा वाढला
रायगड जिल्ह्यात२४ तासांमध्ये १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील २८ लघू पाटबंधारे प्रकल्पातील धरणांमध्ये सरासरी २५.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. अंबा व कुंडलिका नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने, किनाऱ्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली. 
पालघरमध्ये नद्या, नाले तुडुंब
शनिवारी रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार वृष्टी झाल्याने, अनेक मुख्य रस्त्यांचा संपर्क काही काळासाठी खंडित झाला होता. शनिवारी रात्री ७ ते ८ तास पाऊस पडल्याने वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड तालुके आणि परिसरातील नद्या, नाले तुडुंब भरले होते. सूर्या आणि वैतरणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या.
वसई-विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धामणी धरणात ४८ टक्के साठा असून, कवडास धरण बऱ्यापैकी भरले आहे.

Web Title: 'Swap'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.