घुमान संमेलनाचे सुकाणू शरद पवारांच्या हाती
By Admin | Published: January 29, 2015 04:17 AM2015-01-29T04:17:44+5:302015-01-29T04:17:44+5:30
पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत भिन्न मतप्रवाह असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार
पुणे : पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत भिन्न मतप्रवाह असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तेथील सोयीसुविधांमध्ये लक्ष घातले आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून याची खातरजमा केली आहे.
घुमानमधील रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांची वानवा, पिण्याच्या पाण्याची कमतरता या गोष्टी गृहित धरून संमेलनासाठी उत्तम व्यवस्था करण्यात यावी, असे पवारांनी पंजाबचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग बादल यांना सांगितले. त्यावर, आम्हाला जे जे शक्य आहे ते ते देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बादल यांच्याकडून देण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संमेलनाचे अध्यक्षपद एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानाने दिले जावे, असे मत व्यक्त करण्याबरोबरच साहित्य संमेलनासाठी ‘विमानवारी’चे गाजर पुढे करण्यापर्यंत पवारांनी आपला हस्तक्षेप नोंदविला आहे. मात्र त्यांची मध्यस्थी असूनही घुमानच्या विमानाचे टेकआॅफपूर्वीच लॅण्डिंग झाले. संमेलनासाठी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या दोन रेल्वेंसाठी सवलतीच्या दरात तिकिट विक्री व्हावी, अशी सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली असल्याचे सांगण्यात आले.
तसेच संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी मराठी भाषेच्या विकासाकडे कसे पाहिले? आणि कसे पहाण्याची गरज आहे? याविषयावर पवार लेख लिहून देणार असल्याचे देसडला म्हणाले. (प्रतिनिधी)