स्वराज, राजेंना पाठिंबा, मग मारियांना वेगळा न्याय का - उद्धव ठाकरे
By Admin | Published: June 24, 2015 11:19 AM2015-06-24T11:19:49+5:302015-06-24T11:26:45+5:30
ललित मोदी प्रकरणात भाजपा सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंच्या पाठिशी ठामपणे उभा असताना राकेश मारियांना वेगळा न्याया का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - ललित मोदी प्रकरणात भाजपा सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंच्या पाठिशी ठामपणे उभा असताना राकेश मारियांना वेगळा न्याया का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तसेच मोदी प्रकरणाचा नायटा जितका खाजवाल तितका तो वाढतच जाईल, या नायट्याने नाहक बळी जाऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करत हा प्रकार थांबवावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी लंडनमध्ये मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली होती, त्यावरून वाद सुरू असतानाचा भाजपाने मारिया यांच्याकडून याप्रकरणी स्प्ष्टीकरण मागवले होते. त्याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून मारियांची पाठराखण करण्यात आली आहे. राजकारण्यांना सर्व गुन्हे माफ व त्याच कारणांसाठी अधिकारी विनाचौकशी फासावर जाणार असतील तर त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतील, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे.
मोदी प्रकरणात भाजपा सुषमा स्वराज , वसुंधरा राजे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मग तोच न्याय राकेश मारिया यांच्यासारख्या शूर अधिकार्यांना का नसावा? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया यांनी मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात जे अजोड काम केले आहे ते पाहता त्यांच्या व ललित मोदींच्या भेटीचा बागुलबुवा उभा करणं म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- केंद्रातले मंत्री, राजस्थानच्या मुख्यमंत्री यांच्यावर मोदीप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मुंबईचे जोरकस पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही ललित मोदीप्रकरणी आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा बकवास प्रयत्न सुरू आहे. राकेश मारिया लंडन येथे एका कॉन्फरन्ससाठी गेले असताना ललित मोदी त्यांना स्वत:ची कैफियत सांगण्यासाठी भेटले. इंग्लंड हा स्वतंत्र देश आहे व त्या देशाच्या परवानगीने ललित मोदी तेथे वास्तव्यास आहेत. मोदी यांनी हिंदुस्थानात ‘आयपीएल’मध्ये जे दिवे लावले तो वादाचा विषय असला तरी लंडन येथे मोदी यांना बेड्या ठोकून मुंबई किंवा दिल्लीत फरफटत आणण्याचा अधिकार मुंबईच्या आयुक्तांना नाही. परदेशात मंत्री किंवा पोलीस अधिकार्यांसमोर कोण अचानक ‘दत्त’ म्हणून उभे राहील व फोटो काढले जातील याचा नेम नाही. ललित मोदी हे देशात ‘आयपीएल’ क्रिकेटचे बादशहा असताना देशातील सर्वच राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे ‘हसरे’ फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या सगळ्यांवर आता कारवाई करणार काय?
- हे मोदी मारियांना भेटले व मारिया यांनी त्यांना मुंबईत येऊन कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याची सूचना केली. मारियांनी मुंबईत येऊन मोदी भेटीबाबतचा तपशील गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कळवला. एक सरकारी अधिकारी यापेक्षा दुसरे काय करू शकतो?
- मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया यांनी दहशतवाद्यांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या आणि ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी दुरवस्था झालेल्या मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात जे अजोड काम केले आहे ते कसे विसरता येईल? मुंबईच्या सुरक्षेचे आव्हान मारिया यांनी यशस्वीपणे पेलले. येथील गँगवॉर मोडून काढले. गुंडगिरीला लगाम लावला. दहशतवादी कारवायांना आळा बसण्यासाठी उपाययोजना केली. ‘२६/११’च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील त्यांचे योगदान मोठेच आहे. असे सगळे असताना त्यांच्या ललित मोदी भेटीचा बागुलबुवा उभा करणे म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखेच आहे.
- ललित मोदी प्रकरणात भाजप सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या मागे ठामपणे उभा आहे व विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी तुमच्या पदांना धोका नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ललित मोदी प्रकरणात केंद्र सरकारची व भाजपची भूमिका काय आहे हे काय आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायला हवे? मग तोच न्याय राकेश मारिया यांच्यासारख्या शूर अधिकार्यांना का नसावा?
- राजकारण्यांना सर्व गुन्हे माफ व त्याच कारणांसाठी अधिकारी विनाचौकशी फासावर जाणार असतील तर त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतील. ललित मोदी प्रकरणातील सत्य काय हे आज कोणीच सांगू शकत नाही. मोदी प्रकरणाचा नायटा जितका खाजवाल तितका तो वाढतच जाईल. या नायट्याने नाहक बळी जाऊ नयेत, हीच माफक अपेक्षा!