स्वराज्य..! दिल्लीत पुन्हा घुमणार लोकमान्य टिळकांचा आवाज; महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

By Admin | Published: January 25, 2017 02:31 PM2017-01-25T14:31:40+5:302017-01-25T15:17:56+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वीच त्यामध्ये सहभागी होणा-या चित्ररथांची स्पर्धा भरवण्यात येते, त्यामध्ये टिळकांचे व्यक्तीमत्व सादर करणा-या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

Swarajya ..! Lokmanya Tilak's voice revolves around Delhi; Maharashtra tops the chart | स्वराज्य..! दिल्लीत पुन्हा घुमणार लोकमान्य टिळकांचा आवाज; महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

स्वराज्य..! दिल्लीत पुन्हा घुमणार लोकमान्य टिळकांचा आवाज; महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

googlenewsNext
>ऑनलाइनन लोकमत
नवी दिल्ली / मुंबई, दि. २५ - 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करणारे लोकमान्य टिळक यांचा आवाज राजधानी दिल्लीत पुन्हा घुमणार आहे. आणि औचित्य आहे प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथावर होणारे संचलन. या संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित करणारा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वीच या चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते, ज्यामध्ये ' महाराष्ट्राचा चित्ररथ' अव्वल ठरला आहे. तर दुस-या क्रमांकावर आहे तामिळनाडूचा चित्ररथ. 
 
कसा असेल महाराष्ट्राचा चित्ररथ?
या चित्ररथाद्वारे टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सादर करण्यात येणार आहे. लोकमान्यांच्या १६0व्या जयंती वर्षानिमित्त स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान, पारतंत्र्यात ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांनी  चालवलेली सामाजिक जागृती, शिवजयंती व गणेशोत्सव सुरू करून महाराष्ट्रातील जनतेसह भारतीयांना सांस्कृतिक व्यासपीठांवर संघटित करण्यासाठी टिळकांनी हाती घेतलेली मोहीम, ब्रिटिश सरकारने टिळकांविरुद्ध चालवलेले खटले, शिक्षण व व्यायामाला टिळकांनी दिलेले विशेष प्रोत्साहन या बाबींचा चित्ररथात समावेश आहे. 
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा अग्रलेख लिहितानाचा १५ फूट उंचीचा भव्य पुतळा असून, पुतळ्यामागे टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’च्या छपाईसाठी १९१९ साली लंडनहून मागवलेल्या डबल फिल्टर प्रिंटिंग मशिनवर छपाई होत असलेले वृत्तपत्र दर्शवण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरत्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज व श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला बंगालच्या फाळणीनंतर मुंबई हायकोर्टात टिळकांविरुद्ध चाललेला खटला व मंडालेच्या तुरुंगातील त्यांंचा कारावास दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात व्यायामाला व शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या टिळकांच्या स्मृती जागवण्यासाठी मल्लखांब व कुस्ती खेळणारी मुले तसेच बाकावर बसलेल्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लाइव्ह प्रदर्शन आहे.
चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४0 कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरणच्या रूद्राक्ष ग्रुपच्या २८ कलाकारांचे पथक राजपथावर चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना ‘पहिलं नमन हो करितो वंदन, ऐका तुम्ही हो गुणीजन करितो कथन’ या गीतावर नृत्य सादर करणार आहे. मुंबईतल्या दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे ३ क्रीडापटू चित्ररथावर मल्लखांब व कुस्तीची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

Web Title: Swarajya ..! Lokmanya Tilak's voice revolves around Delhi; Maharashtra tops the chart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.