'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:52 PM2024-08-14T17:52:12+5:302024-08-14T17:53:00+5:30

मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला निवडणुकीत उमेदवार उतरवायचे की नाही हे ठरवणार आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. 

'Swarajya' party will contest maharashtra Assembly election; Will Chatrapati Sambhaji Raje and Manoj Jarange form an alliance? | 'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होईलं असं बोललं जातं. परंतु विधानसभेला तिसरी आघाडीही समोर येण्याची शक्यता आहे. त्यात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडूनही विधानसभेची तयारी करण्यात आली आहे. स्वराज्य संघटना विधानसभेला उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. 

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगेंसोबत अद्याप चर्चा झाली नाही परंतु ही चर्चा होणार आहे. त्यांचा दृष्टीकोन आणि माझे उद्दिष्टे हे एकच आहे. आमचे पंजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच पहिले आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेत अंमलात आणले. मनोज जरांगे पाटलांना नेहमीच माझा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांच्याशी लवकरच राजकीय चर्चाही होईल असं त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच मराठा-ओबीसी वाद होऊ नये या मताचा मी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे. आता सगळ्यांनी एकत्र बसणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन केली. शाहू महाराजांनी जे आरक्षण दिले त्यात अनुसुचित जाती-जमाती, मराठ्यांचाही त्यात समावेश होता. सगळ्या जातीतील लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे. ते कसं बसवायचे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक पक्षांनी आपली भूमिका घेतली आहे. ते आरक्षण टिकणार का हेसुद्धा महत्त्वाचे आहे. मी त्यावर सविस्तर बोलणार आहे.मराठा-ओबीसी समाजातील लोकांनी एकत्रित बसायला हवं. यात गरिब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं. 

दरम्यान, आमचे उमेदवार विधानसभेला उभे राहतील. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेले नाही. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत. महायुती-महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आमचा संबंध येत नाही. तिसऱ्या आघाडीचा पर्यायही नाकारता येत नाही. आज माझ्यासोबत राजरत्न आंबेडकर आहेत. हा पहिला टप्पा आहे. सुरुवात झालेली आहे. पर्याय खुले आहेत असंही संभाजीराजे यांनी सांगितले. 

Web Title: 'Swarajya' party will contest maharashtra Assembly election; Will Chatrapati Sambhaji Raje and Manoj Jarange form an alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.