पवारांच्या दबावामुळे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणार नाही, 'त्या' पोस्टवर कोल्हेंचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 07:35 PM2020-02-05T19:35:04+5:302020-02-05T19:39:36+5:30
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
मुंबईः स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एबीपी माझ्याच्या नावानं ही पोस्ट व्हायरल होत आहे. शरद पवारांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली, असं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचं व्हायरल करण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्टवरून अमोल कोल्हे संतापले असून, त्यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात बदनामी करण्यात आली असून, आदरणीय पवारसाहेबांना या प्रकरणात गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. पवारसाहेबांचा कलाक्षेत्राविषयीचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी राष्ट्रवादीत आल्यापासून कधीही पवार साहेबांनी हे दाखवा आणि हे दाखवू नका, असं सांगितलेलं नाही. केवळ वडिलधाऱ्यांच्या भूमिकेतून काही अडचण तर नाही ही चौकशी नक्की केली. त्यामुळे ज्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवल्या जात आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही.
दररोज रात्री 9 वाजता सोमवारी ते शनिवारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरूच राहणार आहे. कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होतेय, या बातमीत कुठलंही तथ्य नाही. जे कोणी अशा बातम्या पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, अशा उपद्रवी मूल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मी महाराष्ट्र पोलिसांकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडेसुद्धा ही मागणी केलेली आहे. अशा समाजकंटकांना आळा बसला पाहिजे. संभाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवण्यासाठी ही मालिका सुरू असून, ती अव्याहतपणे सुरूच राहणार आहे, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे.
भाजपानं ही पोस्ट व्हायरल केल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा अशा बनावट क्लिप व्हायरल करत नसते. मालिक बंद करण्यासंदर्भात काही जणांची मतं असू शकतात. परंतु भाजपा असं काहीही करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.