जिल्ह्यात उभारली स्वराज्यगुढी
By Admin | Published: June 7, 2017 01:46 AM2017-06-07T01:46:00+5:302017-06-07T01:46:00+5:30
६ जून १६७४ रोजी शिवकाळातील प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र कलश रयतेला अर्पण करून रयतेची झोळी सुखसमृद्धीने भरली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांनी ६ जून १६७४ रोजी शिवकाळातील प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र कलश रयतेला अर्पण करून रयतेची झोळी सुखसमृद्धीने भरली, तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत देशातील पहिल्या स्वराज्यगुढीची मुहूर्तमेढ रोवली.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्हा परिषदेच्या वास्तूमध्ये स्वराज्यगुढी उभारली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गटनेते शांताराम इंगवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहीनकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड, मुख्य समन्वयक अनिल पवार, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्यगुढी उभारण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केलेला होता. ही स्वराज्यगुढी पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुके व १४०७ ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात आली.