स्वरराज छोटा गंधर्व जयंती निमित्त : कोण तुजसम सांग मज गुरुराया..?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:32 AM2020-03-11T11:32:06+5:302020-03-11T11:35:44+5:30
संगीत रंगभूमीवर चार गंधर्व स्वर्गलोकांतून अवतरले...
बालगंधर्व, कुमार गंधर्व, सवाई गंधर्व आणि छोटा गंधर्व यांनी आपलं संगीत प्रसादाच्या रूपाने शिष्यांना वाटून पुन्हा एकदा स्वर्गलोकी विराजमान झाले. त्यातील एक गंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व यांची १० मार्चला जयंती.
अनुराधा राजहंस -
स्वरराज छोटा गंधर्व यांचे मूळचे नाव श्री. सौदागर नागनाथ गोरे. १० मार्च १९१८ रोजी कोरेगावजवळच्या भाडळेगावी त्यांचा जन्म झाला. बालमोहन संगीत मंडळाचे संस्थापक दामूअण्णा जोशींनी छोटा गंधर्वांचे गाणे ऐकले आणि आपल्या बालनाट्यातून भूमिका करण्यासाठी ते त्यांना आपल्यासोबत घेऊन आले. २२ जुलै १९२८ म्हणजे वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी नाटकातून भूमिका करायला सुरुवात केली. ‘प्राणप्रतिष्ठा’ हे त्यांचं पहिलं नाटक! याशिवाय स्वर्गावर स्वारी, कर्दनकाळ, संशयकल्लोळ इ. अनेक नाटकांतून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. श्री. बागलकोटकर, श्री. बळवंतराव गोवित्रीकर, श्री. पाध्ये इ. गुरूंकडे त्यांनी संगीताचे शिक्षण पूर्ण कले. आचार्य अत्र्यांच्या ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील त्रिपदी ही त्यांची शेवटची स्त्रीभूमिका.
यानंतर आचार्य अत्र्यांच्या भ्रमाचा भोपळा, उद्याचा संसार, लग्नाची बेडी इ. अनेक नाटकांतून त्यांनी पुरुष भूमिका केल्या, तर १९५० नंतर छोटा गंधर्वांनी सौभद्र, मानापमान, विद्याहरण या प्रमुख संगीत नाटकांतून भूमिका केल्या. संगीत सौभद्रमधील कृष्णांनी तर रसिकांच्या मनात, हृदयात स्थान मिळवलं. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सन्मानाने ‘बालकिन्नर’ ही पदवी बहाल केली.
६० व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले होते, ‘गाणे, मग ते नाटकातले असो, की बैठकीतले ते गोडच असायला हवे. जे गोड नाही ते गाणं नाही. मुखाशी आणि कानाशी ज्या गोष्टींचा संबंध येतो, त्या गोडच असायला हव्यात.’
‘सौदागर’ हे खरं म्हणजे ज्योतिषाचं दुसरं नाव आहे. वस्त्रे विणणाºया घरात जन्मलेल्या या कलावंताने संगीताचे सूर असे मुलायम विणले, की त्याचे वस्त्र आभाळाला गवसणी घालणारे ठरले.
छोटा गंधर्वांच्या षष्ट्यब्दी समारंभाच्या वेळी त्यांच्या मानपत्राचे शब्दांकन ना. सी. फडके यांनी केलं होतं. त्यात त्यांनी ‘आपल्या सुरेल, खणखणीत, मधुर आणि स्वरसाजांनी नटलेल्या गायकीने आपण रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे,’ असं म्हटलं आहे.
असं सांगतात, की संगीत सुवर्णतुला या नाटकातील पदांच्या चाली एका दिवसात स्वरराजांनी दिल्या होत्या. ते केवळ गायक, संगीतकार होते असं नाही तर ते उत्तम कवीही होते. त्यामुळेच आजही ते आपली पदे, काव्य, अभिनय इ.द्वारे रसिकांच्या मनात घर करून आहेत. म्हणूनच त्यांच्याबद्दल बोलायचे तर, ‘स्वरराज, म्हणजे सुरांचे सच्चे, लयीला पक्के आणि रंजकतेचे सदैव भान असणारे’ असे हे कलाकार.
असे गंधर्व भूतलावर येणे म्हणजे ‘परमेशाच्या ऐशा लीलाच’ आहेत. बालगंधर्वांनंतर संगीत रंगभूमीला लागलेली उतरती कळा घालवून पुन्हा एकदा संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे, असे हे स्वरराज म्हणजे खरोखरच ‘देव माणूस.’
स्वरराजांसारख्या स्वत:ची मुद्रा उमटवलेल्या चिरंजीव स्वरांची निर्मिती करणाऱ्या कलावंताची फक्त जयंतीच साजरी करावी. कारण मृत्यू आला तो स्वरराज छोटा गंधर्वांच्या पार्थिव देहाला. पण त्यांचे अपार्थिव स्वर मात्र अमर आहेत.
बालगंधर्वांना तर कायम त्यांनी गुरुस्थानी मानलं. ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया’ अशाच प्रकारच्या भावना त्यांच्या मनात होत्या. पण आज सर्व रसिकांच्या मनात मात्र संगीत रंगभूमी पुन्हा बहरून आणणाऱ्या या कलाकाराविषयी ‘कोण तुजसम?’ अशाच प्रकारच्या भावना आहेत.
आज स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे वास्तव्य असलेल्या प्रभात रोडच्या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. महानगरपालिकेने वाहिलेली अशी ही या महान गायकाला ‘श्रद्धांजली.’