वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!
By admin | Published: June 9, 2015 11:23 PM2015-06-09T23:23:28+5:302015-06-10T00:34:57+5:30
कार्यालयाची तोडफोड : कर्मचारी पळाले; थकित बिले देण्याची मागणी
सांगली : उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. लेखा विभाग, साखर, रोखपाल, तोडणी व संगणक विभागातील खिडक्यांच्या, केबिनच्या तसेच टेबलच्या काचा फोडल्या. दोन संगणकही फोडले. खुर्च्या, टेबल भिरकावले. या प्रकारामुळे भीतीने कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन करून दुसऱ्या विभागात आश्रय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर कारखाना तसेच कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
साखर कारखान्याचा तीन महिन्यांपूर्वी गळीत हंगाम संपला आहे. वसंतदादा कारखान्याची २०१३ ची १५ कोटींची, तर २०१४ ची ३१ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतदादा कारखान्यावर धडक मारली. कारखान्याच्या मुख्य गेटमधून थेट लेखा विभागाजवळ ते गेले. या विभागातच ऊस तोडणी, संगणक, रोखपाल व साखर विभाग आहे. तिथे प्रवेश करण्यापूर्वी बाहेर असलेल्या खिडकीवर कार्यकर्त्यांनी लाथा मारून काचा फोडल्या. तिथे सभासदांच्या माहितीसाठी लावलेला सूचना फलक काढून टाकला.
अध्यक्षासह २३ जणांविरुद्ध गुन्हा
कारखान्यातील रखवालदार पांडुरंग राजू बंडगर यांनी सायंकाळी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार स्वाभिमानीचे मिरज तालुका अध्यक्ष महावीर पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज) यांच्यासह २० ते २३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबिन, टेबल व खिडक्यांच्या काचा फोडून ४० ते ५० हजारांचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
नाकाबंदी... बंदोबस्त तैनात
हल्ला झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी हल्ल्याची सर्व माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर शहर व परिसरात नाकाबंदी केली होती.
शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक : राजू शेट्टी
खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. वसंतदादा कारखान्यावर हल्ला झाल्याचे मला समजले आहे. कारखान्याचे प्रशासन दोन-दोन वर्षे शेतकऱ्यांच्या उसाचे बिले देत नसेल, तर आणखी काय होणार? बिले कधी देणार, यासाठी फोन केला, तर फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांनी काही बिया किंवा खतांची चोरी केलेली नाही. त्यांनी कष्टाने उसाचे पीक उभे करुन तुमच्या कारखान्याला ऊस घातला. मग त्याची बिले वेळेत द्यायला नको का? हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. जिल्ह्यातून अन्य कारखान्यांनी यातून काय समजून घ्यायचे ते घ्यावे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही तोडफोड केल्याचे वाटत नाही. संघटना कधीच अशी कृती केल्याचे दिसले नाही. राजकीय पूर्ववैमनस्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. वसंतदादा कारखाना बंद पडल्याशिवाय ज्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही, अशा नेत्यांचेच हे कृत्य असावे.
- विशाल पाटील,
अध्यक्ष वसंतदादा साखर कारखाना,सांगली