देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्यायच झाला - नितीन गडकरी
By admin | Published: February 26, 2017 11:03 PM2017-02-26T23:03:05+5:302017-02-26T23:03:05+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा निश्चितच मौलिक होता. त्याग, समर्पण, देशभक्ती यांचे ते परमोच्च उदाहरण होते.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा निश्चितच मौलिक होता. त्याग, समर्पण, देशभक्ती यांचे ते परमोच्च उदाहरण होते. त्यांची निष्ठा, लेखन, साहित्य, समाजकार्य, विचार आणि वक्तृत्व यांना तोडच नव्हती. मात्र आपल्या देशात सावरकर अनेकांना समजलेच नाहीत. त्यांच्यावर सातत्याने अन्यायच झाला, अशी खंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते.
सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक तरुणांचे स्फुल्लिंग जागृत केले. सोबतच त्यांनी हिंदुत्वाची सर्वसमावेशक व्याख्या केली. समाजातील जातीय भेदाभेद दूर व्हावा यासाठी ते झटले. मात्र स्वातंत्र्याअगोदर व नंतरही त्यांची उपेक्षाच झाली. म्हणूनच त्यांना वेळोवेळी विरोध झाला. मात्र जर सावरकर देशभक्त नसतील, तर देशात एकही देशभक्त नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
सावरकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आतापर्यंत दुर्दैवाने त्यात हवे तसे यश आलेले नाही. सावरकरांच्या विचारांचा हिंदूधर्मातील लोकांनी आदर केला असला तर आज देशाचे सामाजिक चित्र हे फार वेगळे व सुधारणावादी असते. सावरकरांच्या विचारांतील हिंदुत्व हे देशाच्या भविष्याचे राष्ट्रीयत्व आहे. नवीन पिढ्यांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचविले पाहिजेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.