१५ ते २० मंत्र्यांचा उद्या शपथविधी? अजित पवारांकडून अर्थखाते जाण्याची शक्यता; आमदारांत धाकधुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 07:06 IST2024-12-13T06:34:41+5:302024-12-13T07:06:03+5:30
Cabinet Expansion news: शिंदेसेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचेही समजते.

१५ ते २० मंत्र्यांचा उद्या शपथविधी? अजित पवारांकडून अर्थखाते जाण्याची शक्यता; आमदारांत धाकधुक
- चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, यावेळी १५ ते २० मंत्र्यांचाच शपथविधी होण्याची शक्यता आहे. यात भाजपचे आठ ते दहा, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येक चार ते पाच मंत्री असू शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
शिंदेसेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचेही समजते. अजित पवार गटाला अर्थ खाते देण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली होती. यामुळे अजित पवार राजधानीत ठाण मांडून बसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
अजित पवारांचा आग्रह
आधीच्या सरकारमध्ये अजित पवार गटाचे नऊ मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद होते. फडणवीस यांच्या सरकारमध्ये हीच परिस्थिती कायम रहावी, यासाठी ते आग्रही आहेत.
शरद पवारांची सहकुटुंब भेट
अजित पवार यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून शरद पवार यांची कुटुंब आणि नेत्यांसोबत भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.
भेटीगाठींमुळे चर्चांना ऊत
फडणवीस आणि पवार दिल्लीत असल्यामुळे गुरुवारचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजला. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तर अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.