शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:26 PM2024-07-07T20:26:24+5:302024-07-07T20:27:00+5:30
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रविधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथविधी सोहळा उद्या, सोमवारी ८ जुलै रोजी विधानपरिषदेत होणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधान परिषदेच्या कोकण विभाग व मुंबई पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीसाठीची मतमोजणी ०१ जुलै, २०२४ रोजी पार पडली.
या निवडणुकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर, मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे हे विजयी झाले.