शिवनेरीवर शपथ; भाजपात गटबाजी
By admin | Published: March 4, 2017 01:18 AM2017-03-04T01:18:37+5:302017-03-04T01:18:37+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली.
जुन्नर : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे गटाचेच नगरसेवक उपस्थित होते. अन्य गटांच्या नगरसेवकांनी दांडी मारल्याने भाजपातील गटबाजी उघड झाली आहे.
शिवनेरी किल्ल्यावर शुक्रवारी शपथ ग्रहण कार्यक्रम झाला. या वेळी आमदार लांडगे यांच्यासोबत आळंदी नगरपालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील ४१ नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांना शिवनेरी गडावर निष्ठा व प्रामाणिकपणाची शपथ दिली.
दरम्यान, शिवाजीमहाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी गटावरील शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर ज्येष्ठ पदाधिकारी विजय फुगे यांनी आळंदी नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांना एकनिष्ठता आणि प्रामाणिक कारभाराची शपथ दिली. आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘भोसरीच्या विकासासाठी व्हिजन-२०२० हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. भोसरीचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने कटिबद्ध राहावे. तसेच विकासाच्या मुद्द्यावर भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांच्यासोबत निष्ठेने काम करावे. नागरिकांना दिलेला प्रामाणिक कारभाराचा शब्द पूर्ण करावा. यासाठीच ही शपथ देण्यात आली आहे.’’
आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ऐतिहासिक कुसूर गावातील विकासकामांची पाहणी करण्यात आली. दरम्यान या उपक्रमास केवळ आमदार लांडगे गटाचेच नगरसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)