बुधवारी शपथविधी!
By admin | Published: October 24, 2014 04:40 AM2014-10-24T04:40:32+5:302014-10-24T04:40:32+5:30
सरकार स्थापन करण्याला अखेर मुहूर्त सापडला असून, २७ आॅक्टोबरला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर बुधवार, २९ आॅक्टोबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे
मुंबई : सरकार स्थापन करण्याला अखेर मुहूर्त सापडला असून, २७ आॅक्टोबरला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर बुधवार, २९ आॅक्टोबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणेची आता केवळ औपचारिकता उरली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नव्हेतर शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपा सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले असून, मंत्रिपदे आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबत उभय पक्षांत बोलणी सुरू आहे. शिवसेनेला नव्या युती सरकारमध्ये १२ मंत्रिपदे दिली जातील. शिवसेनेने गृह खात्यासह १४ मंत्रिपदांची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच असल्याचे चित्र दिसत असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व रा.स्व. संघाने फडणवीस यांच्याच नावाला हिरवा कंदील दाखवला असल्याने फडणवीस यांची निवड निश्चित समजली जात आहे. गुरुवारी ‘लक्ष्मी’पूजनाच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी गडकरी यांची त्यांच्या वाड्यावर जाऊन भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते भाजपाच्या कार्यालयातही भेटले. या भेटीत गडकरींनी फडणवीस यांना ‘शुभेच्छा’ दिल्या, तर फडणवीस यांनी, मला तुमच्याप्रति नेहमीच आदर आहे. मी तुमच्याकडे माझा नेता म्हणूनच पाहत आलो आहे, अशी कृतज्ञता व्यक्त केल्याचे समजते. फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील याची पूर्ण
कल्पना पक्षनेतृत्वाने गडकरी यांना चार दिवसांपूर्वीच दिली होती. त्यांच्या समर्थकांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामागे पक्षाच्या आमदारांवर गडकरी यांची पकड असल्याचे दर्शविणे हा हेतू होता, असे मानले जात आहे. शिवसेनेला नव्या युती सरकारमध्ये १२ मंत्रिपदे भाजपाकडून दिली जातील. सेनेने गृह खात्यासह १४ मंत्रिपदांची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ की १४ या बाबतचा फैसला सोमवारी दोन पक्षांमध्ये होणाऱ्या चर्चेदरम्यान होऊ शकतो. भाजपाने गृह खाते शिवसेनेला देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिवसेनेला दिले जाणार नाही. भाजपामध्येही कोणाला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही, अशी माहिती मिळते.
भाजपा नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा झाली असून सोमवारी पुढील चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार हजर राहतील, असे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.