संरक्षण क्षेत्रात स्वीडनची महाराष्ट्रात गुंतवणूक, अॅटलस कॉप्कोचे मुख्यालय औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:21 AM2017-10-14T04:21:56+5:302017-10-14T04:22:39+5:30
संरक्षण साहित्यांचे उत्पादन करणा-या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण असून अशी गुंतवणूक झाल्यास भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल,
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संरक्षण साहित्यांचे उत्पादन करणा-या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण असून अशी गुंतवणूक झाल्यास भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वीडनचे संरक्षणमंत्री पीटर हल्टक्विस्ट यांच्याशी झालेल्या भेटीत व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीडनच्या दौºयात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी स्थापन केला असून असा निधी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अॅटलस कॉप्को समुहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट्स रॅह्मस्ट्रॉम तसेच प्रबंध संचालक जिओवॅनी व्हॅलेंट यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात अधिक विस्तार करण्याचे उद्योगसमुहाचे नियोजन असून राज्यात मुख्यालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती रॅह्मस्ट्रॉम यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. उद्योगसमुहाने आपल्या मुख्यालयासाठी औरंगाबाद येथील जागेचा विचार करावा, तसेच तेथे कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापनाही करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य शासन त्यास आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन त्यांनी चर्चेत दिले.
पार्कचा प्रस्ताव-
डेव्हीसिटीच्या प्रबंध संचालक सोनिया नेतालकर यांनीही आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन वर्धा येथे लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला. या उद्योगाच्या प्रकल्पास शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.