विखे-पाटलांची पणती स्वीडनच्या पंतप्रधानांची सल्लागार
By admin | Published: January 25, 2016 03:00 AM2016-01-25T03:00:35+5:302016-01-25T03:00:35+5:30
अहमदनगर जिल्ह्णातील सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची पणती नीला हिची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड झाली आहे
मुंबई : अहमदनगर जिल्ह्णातील सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची पणती नीला हिची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड झाली आहे. अनेक शिक्षण संस्था चालविणाऱ्या अशोक विखे-पाटील यांची ती कन्या, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुतणी आहे.
३० वर्षीय नीला २०१४ सालापासून स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासोबत काम करीत आहे. तर २०१२ सालापासून ती सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे काम करीत आहे, असे अशोक विखे-पाटील यांनी सांगितले. आता पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून ती करप्रणाली, स्त्री-पुरुष धोरण आणि विकास आदीचा कारभार पाहणार आहे. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला हिने बालपणीचा काही काळ अहमदनगरमध्ये घालविला. तिने गुटेनबर्ग वाणिज्य विद्यापीठातून वाणिज्य व कायदा विषयांत पदवी आणि एमबीए केले आहे. तसेच माद्रिद येथील कॉम्प्युटेंस विद्यापीठातूनही एमबीए केले आहे. नीला ग्रीन पार्टी कार्यकारी मंडळाची सदस्या होती. (प्रतिनिधी)