पुण्यात ‘स्वाईन अलर्ट’
By admin | Published: March 23, 2017 02:54 AM2017-03-23T02:54:20+5:302017-03-23T02:54:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने
पुणे : गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्याने रुग्णांमधील धोका वाढला आहे. राज्यात स्वाईन फ्लूचे २२२ रुग्ण आढळले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत आरोग्य सचिवांनी स्वाईन फ्लूबाबत पुण्याला ‘हाय अलर्ट’ दिला आहे.
आजवर झालेल्या मृत्यूपैकी ३५ टक्के रुग्ण पुणे शहर आणि ग्रामीण भागातील आहेत. शहरात जानेवारी महिन्यापासून १०५ रुग्णांची नोंद झाली असून, १७ रुग्णांचा मृत्यू झाला, ५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या २९ स्वाईन फ्लूचे रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील १३ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे १८०० लसी उपलब्ध होत्या. त्यापैकी १४०० लसी देण्यात आल्या आहेत. अधिक लसींसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, मेपर्यंत नवीन लस उपलब्ध होणार आहे. रुग्णांकडून गोळयांना मागणी असून, लसीकरणासाठी आग्रही राहण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभाग प्रमुख एस.टी.परदेशी यांनी दिली.
आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या २५,००० लसींपैकी आतापर्यंत रुग्णांना १८,००० लसी देण्यात आल्या असून ७००० लसी शिल्लक आहेत. मे महिन्यात नवीन लस उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. ते म्हणाले, मार्च महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्याचे वातावरण विषाणूच्या वाढीस पोषक असल्याने गेल्या काही वर्षांपासून येथे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. गर्भवती महिला, मधुमेह किंवा तत्सम जोखमीचे आजार असलेल्या रुग्णांनी लसीकरण करुन घ्यावे आणि सामान्य रुग्णांनी फ्लूची लक्षणे दिसून आल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)