राज्यात २४ तासांत स्वाइन फ्लूचे १० बळी!
By admin | Published: March 4, 2015 01:59 AM2015-03-04T01:59:47+5:302015-03-04T01:59:47+5:30
राज्यात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या २४ तासांत १० जणांचा बळी गेला आहे. राज्यातील एकूण बळींची संख्या १६२ वर पोहोचली, तर ११० नवे रुग्ण आढळून आले.
पुणे : राज्यात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या २४ तासांत १० जणांचा बळी गेला आहे. राज्यातील एकूण बळींची संख्या १६२ वर पोहोचली, तर ११० नवे रुग्ण आढळून आले. दुसरीकडे देशभरात ४३ जणांचा मृत्यू झाला असून, दोन महिन्यांत स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १,१५८ वर पोहोचली आहे.
नागपूर, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूची तीव्रता अधिक असली तरी राज्याच्या इतर भागांतही या आजाराचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या २४ तासांत १० हजार नागरिकांनी स्वाइन फ्लूची तपासणी करून घेतली. त्यापैकी लागण झालेले ११० नवे रुग्ण सापडले. यामुळे या वर्षातील
लागण झालेल्या रुग्णांची संख्या १,८९९ वर पोहोचली आहे. यापैकी विविध रुग्णालयांमध्ये ४४५ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ३८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पूर्णपणे बरे झालेल्या ८३ जणांना रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आले आहे. नागपूर शहर, पुणे शहर, नाशिक, लातूर, पुणे ग्रामीण, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, ठाणे व अहमदनगर येथे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव अधिक आहे. मात्र आता जळगाव, सोलापूर, मुंबई, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, गोंदिया, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, पालघर, उस्मानाबाद, भंडारा, बीड, अकोला या जिल्ह्यांतही स्वाइन फ्लूचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
गुजरातमध्ये सर्वाधिक !
गुजरातमध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक म्हणजे २८३ लोकांचा बळी घेतला. तेथे ४,७६६ जणांना या रोगाची लागण झाली आहे. एकट्या अहमदाबादेत ७९ जण दगावले आहेत. राजस्थानमध्ये २७७ जण दगावले असून ५,७१४ लोकांना याची लागण झाली आहे.
अहमदाबादमधील वेगवेगळ्या न्यायालयांतील जवळपास १० हजारांवर वकिलांनी स्वाइन फ्लूच्या भीतीने ३ मार्च ते ७ मार्च या काळात सामूहिक सुटी घेतली आहे.