अमरावती विभागास ‘स्वाइन फ्लू’चा विळखा!
By Admin | Published: May 1, 2017 02:01 AM2017-05-01T02:01:01+5:302017-05-01T02:01:01+5:30
चार जिल्ह्यांत १६ रुग्ण दगावले : ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा आकडाही वाढताच!
अकोला : प्रचंड उष्णतामान असतानाही अमरावती विभागात ‘स्वाइन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने प्रसार होत असून, विभागातील पाचपैकी चार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत या आजाराची लागण झाल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे ५७ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळले असून, या जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी चार, तर वाशिम जिल्ह्यातील एका जणाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. स्वाइन फ्लू हा सामान्य आजार असला, तरी प्रतिकारशक्ती कमजोर असलेल्या व्यक्ती या आजाराचे सहज लक्ष्य ठरतात. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाइन फ्लूचा प्रसार थांबू शकतो.
११ हजारांवर नागरिकांची स्क्रिनिंग
आरोग्य विभागाकडून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत ११,७९७ लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. यामध्ये ३४२ जण संशयित आढळले असून, त्यापैकी १८८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
आरोग्य यंत्रणा सज्ज
स्वाइन फ्लूचा झपाट्याने प्रसार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सरसावली असून, खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आल्या असून, सर्वच जिल्ह्यांमध्ये टॅमी फ्लू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असली, तरी नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळता येऊ शकतो. लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे.
- डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.