‘स्वाइन फ्लू’चा शहरात दुसरा बळी!

By admin | Published: April 10, 2017 12:57 AM2017-04-10T00:57:15+5:302017-04-10T00:57:15+5:30

अकोला- रविवारी ‘स्वाइन फ्लू’मुळे दुसरा बळी गेल्यामुळे शहरवासीयांसमोर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

'Swine Flu' creates second victim in city | ‘स्वाइन फ्लू’चा शहरात दुसरा बळी!

‘स्वाइन फ्लू’चा शहरात दुसरा बळी!

Next

अकोला : तीव्र उष्णतेच्या वातावरणातही शहरामध्ये स्वाइन फ्लूचा जीवघेणा आजार पसरत असून, रविवारी ‘स्वाइन फ्लू’मुळे दुसरा बळी गेल्यामुळे शहरवासीयांसमोर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गत काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये स्वाइन फ्लूचे संशयी रुग्ण मिळून येत आहेत. ४ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने शहरावर स्वाइन फ्लू आजाराचे संकट असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते; परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले. रविवारी शहरातील गीता नगर परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलेला शनिवारी खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते; परंतु उपचारादम्यान तिचा रविवारी मृत्यू झाला.
महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचा संशय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाने महिलेच्या रक्ताचे व स्वॉबचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच महिलेचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होईल.
महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी रात्री गीता नगर भागाचा दौरा केला आणि या ठिकाणी मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना परिसरात स्वच्छतेचे निर्देश दिले.

महापालिकेचा ठराव कागदावरच
‘लोकमत’ने प्रभाग क्रमांक १५ मध्ये अज्ञात आजाराने आठ डुकरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. शहरामध्ये मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला असून, या डुकरांमध्ये नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, तसेच शहरातील नाल्या मोठ्या तुंबलेल्या आहेत. मोकाट डुकरे शहराबाहेर न्यावी, याबाबतचा महापालिका सभागृहात ठराव झाला होता; परंतु पुढे ठरावाची अंमलबजावणी मनपा प्रशासनाने केली नाही.

महापौरांनी बोलाविली बैठक
शहरावरील स्वाइन फ्लूचे वाढते संकट लक्षात घेता, महापौर विजय अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता महापालिका आरोग्य विभागासह मलेरिया विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविली आहे.

मोकाट डुकरांचा बंदोबस्त करू
डुक्कर पालन करणाऱ्यांनी त्यांची डुकरे शहराबाहेर न्यावीत, अन्यथा महापालिका प्रशासन डुकरांना पकडून त्यांचा लिलाव करेल, अशी माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला दिली.

 

Web Title: 'Swine Flu' creates second victim in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.