कोल्हापूरच्या तरुणाचा ‘स्वाइन फ्लू’ने पुण्यात मृत्यू
By admin | Published: February 9, 2015 12:26 AM2015-02-09T00:26:55+5:302015-02-09T00:36:02+5:30
रुईकर कॉलनी येथील गणेश अपार्टमेंटमधील बोडके कुटुंबीय ट्रॅव्हल्स व्यवसायानिमित्त पाच वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झाले.
कोल्हापूर : कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील विजय दशरथ बोडके (वय २६, रा. सध्या रा. न्यू हिलटॉप सोसायटी, धनकवडी, पुणे) याचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने शनिवारी (दि. ७) पुण्यात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पाच वर्षांपासून बोडके यांचे कुटुंबीय धनकवडी परिसरात वास्तव्यास आहेत. येथील विजय ट्रॅव्हल्सचे दशरथ बोडके (बाळासाहेब बोडके या नावाने परिचित असलेले) यांचा तो मुलगा होय. रुईकर कॉलनी येथील गणेश अपार्टमेंटमधील बोडके कुटुंबीय ट्रॅव्हल्स व्यवसायानिमित्त पाच वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झाले. दशरथ बोडके यांचा मुलगा छायाचित्राचा व्यवसाय असलेल्या कंपनीत कामास होता. आठ दिवसांपासून त्याला सर्दी, खोकला व तापाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी विजयला प्रथम खासगी क्लिनिकमध्ये दाखविले. पण, डॉक्टरांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खासगी रुग्णालयात ठेवले. उपचार सुरू असताना शनिवारी (दि. ७) दुपारी त्याचा मृत्यू झाला. मृतदेह नातेवाइकांनी रात्री उशिरा कोल्हापुरात आणला. पंचगंगा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
विजयचे बी. ए.पर्यंतचे शिक्षण ताराबाई पार्कातील विवेकानंद महाविद्यालयात झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आज, सोमवारी सकाळी रक्षाविसर्जन आहे. (प्रतिनिधी)