राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:43 AM2019-06-03T02:43:31+5:302019-06-03T06:15:18+5:30
नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे.
मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, जानेवारी ते मे या काळात १ हजार ५९२ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत राज्यभरात १७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या नागपूर आणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे.
नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. यंदा राज्यभरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांना पोषक वातावरण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, पुणे, नागपूर व अहमदनगरमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे स्वाइनची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला, धाप लागणे, दोन-तीन दिवस ताप राहणे, घसा खवखवणे असे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत स्वाइन फ्लू लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसºया व तिसºया तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ जणांना ही लस देण्यात आली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर ४२,४९२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. १ जानेवारी ते ३० जून २०१८ अखेर १,२८,०२६ व्यक्तींना लसीकरण देण्यात आले आहे. यंदा १ जानेवारी ते २६ मे २०१९ या कालावधीत २ हजार ९९० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.