राज्यभरात स्वाइन फ्लूने घेतले १९७ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:40 AM2019-08-29T05:40:14+5:302019-08-29T05:40:23+5:30
जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
मुंबई : राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरीही साथीच्या आजारांचा जोर कमी झालेला नाही. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी डेंग्यू, मलेरियामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आॅगस्ट महिन्यापर्यंत राज्यभरात स्वाइन फ्लूचे १९७ बळी गेले असून, दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती नव्या स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव नाशिक, नागपूरमध्ये आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगरसारख्या शहरी भागांतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले.नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३२ जण दगावले, तर नागपूर २६, पुण्यात १७, अहमदनगर १६, कोल्हापूर ९ आणि ठाण्यात ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिक आणि नागपूरमध्ये आढळलेल्या २९ हजार ७०२ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत.
‘आजार अंगावर काढू नयेत’
२०१७ मध्ये वर्षभरात ४२ हजार ४९२ जणांना लसीकरण करण्यात आले, तसेच २०१८ या वर्षात एक लाख २८ हजार जणांना तर जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत ४७ हजार ६०६ जणांना लसीकरण करण्यात आले. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांनीदेखील स्वत: काळजी घेत, सर्दी, ताप, घसादुखीसारखे आजार अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे राज्य संसर्गजन्य रोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.