स्वाईन फ्लूचा कहर सुरूच!
By Admin | Published: March 6, 2015 01:42 AM2015-03-06T01:42:41+5:302015-03-06T01:42:41+5:30
बुलडाण्यात संशयीत रूग्णाचा मृत्यू, अकोल्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू स्वाईन फ्लूनेच.
अकोला : पश्चिम विदर्भात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका स्वाईन फ्लू संशयित रूग्णाचा मृत्यू बुधवारी झाला. दरम्यान, संशयित रूग्ण म्हणून सोमवारी मरण पावलेल्या अकोल्यातील एका महिलेचा बळी स्वाईन फ्लूनेच घेतल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील रहिवासी सुनील सदाशिव साळवे (४६) हे येवती येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली रायगाव येथील हायस्कुलवर झाली होती. दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे २६ फेब्रुवारीपासून ते रजेवर होते. मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते; परंतू प्रकृती खालावल्याने त्यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ४ मार्च रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. साळवे यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
दरम्यान, स्वाइन फ्लूचा संशयित रूग्ण म्हणून सोमवारी रात्री मृत्यूमुखी पडलेल्या अकोला शहरातील महिलेचा बळी स्वाइन फ्लूनेच घेतला असल्याचे गुरूवारी वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.
आकोट फैलमधील इंदिरानगर येथील रहिवासी ज्योती रवि बल्लाळ (४0) हिला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यांचा वैद्यकीय अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. त्यानुसार त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आता तीन बळी झाले आहेत. नागरिक स्वाइन फ्लूमुळे दहशतीत असून, आरोग्य विभागाच्यावतीने मात्र प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र दिसत आहे.