स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:32 PM2022-09-04T13:32:41+5:302022-09-04T13:33:47+5:30
मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण असून बाजारात त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळांत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची दाहकता कमी झाली असली तरी काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात २,३३७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तसेच ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीत गर्दीमुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी या काळात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा
नागरिकांनी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. मात्र, त्याचवेळी स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाचेही भान ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी शक्यतो मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूसारख्या आजाराचा प्रादुर्भाव शक्यतो वाढणार नाही. परंतु आपण कोणतेच भान बाळगले नाही, तर त्याचा भविष्यात नक्कीच त्रास होऊ शकतो.
- डॉ. राहुल पंडित,
सदस्य, राज्य कोरोना कृती दल.
कोरोना नियमांचे पालन गरजेचे
कोरोनाचा कराल काळ आपण पाहिला, अनुभवला. त्यातून आपण काही शिकलो की नाही, हा प्रश्न आहे. मूलभूत गोष्टी आपण विसरतो. इकडे तिकडे थुंकणे, शिंकताना नाकावर रुमाल न ठेवणे या सगळ्या गोष्टी थांबायला हव्या. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून जायला हवे, हे आता लोकांनी कधीच विसरता काम नये. विशेषत: सहव्याधी असलेल्यांनी तर हे नियम काटेकोरपणे पाळायलाच हवे. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहायचे असेल तर कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम पाळत होतो, ते पाळणे गरजेचे आहे. - डॉ. समीर गर्दे, श्वसनविकार तज्ज्ञ