मुंबईत स्वाइनचे नवे ४८ रुग्ण
By Admin | Published: March 9, 2015 06:00 AM2015-03-09T06:00:44+5:302015-03-09T06:00:44+5:30
तापमान वाढल्यावर स्वाइन फ्लू कमी होईल,असे तज्ज्ञांचे मत होते. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपल्यावरही मुंबईचे तापमान म्हणावे तितके वाढलेले नाही.
मुंबई : तापमान वाढल्यावर स्वाइन फ्लू कमी होईल,असे तज्ज्ञांचे मत होते. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपल्यावरही मुंबईचे तापमान म्हणावे तितके वाढलेले नाही. यामुळेच स्वाइनचा जोर अजूनही कमी झालेला नाही. ८ मार्च रोजी मुंबईत स्वाइनचे नवे ४८ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आढळलेल्या ४८ रुग्णांपैकी ३२ पुरूष तर १६ महिला आहेत. २९ जण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत असून १९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. मुंबईतल्या रुग्णांची संख्या एका महिन्यात ८०२ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील तापमान वाढायला सुरूवात झाल्यामुळे पुन्हा एकदा वातावरणात बदल होतील. या बदलांमुळेच सर्दी, खोकला, ताप असा त्रास मुंबईकरांना जाणवू शकतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करू नका. स्वाइन फ्लूची हीच लक्षणे असल्यामुळे तीन दिवसांत त्रास कमी झाला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)