स्वराज्याच्या शिलेदारांच्या अथांगतेची गाथा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:49 AM2020-02-02T01:49:44+5:302020-02-02T01:50:17+5:30
- राज चिंचणकर अथांग सागराच्या रंगमंचावर शत्रूसैन्य घिरट्या घालत आहे आणि अशातच किल्ल्याच्या भिंती लवकर उभ्या राहाव्यात म्हणून एकावर ...
- राज चिंचणकर
अथांग सागराच्या रंगमंचावर शत्रूसैन्य घिरट्या घालत आहे आणि अशातच किल्ल्याच्या भिंती लवकर उभ्या राहाव्यात म्हणून एकावर एक दगड रचले जात असतानाच, दुसऱ्या हाताने तोफेला बत्तीही दिली जात आहे. हे दगडसुद्धा अशा पद्धतीने रचले जात आहेत, की त्यांच्यामधून समुद्राच्या भरतीचे पाणी अलगद आरपार निघून जाणार आहे.
इतकेच नव्हे; तर बेटावरचे दगड काढून किल्ल्याच्या तटासाठी वापरल्यावर, दगड निघालेल्या खळग्यांमध्ये पावसाचे गोड पाणी आपसूक साठणार आहे...! या नामी संकल्पनेला तब्बल साडेतीनशे वर्षांचा काळ उलटून गेला आहे राजेहो...! काळ सरला, पण ज्याच्या अंगाखांद्यावर हे सगळे घडले, तो 'खांदेरी' किल्ला आजही भरसमुद्रात या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे आणि किल्ल्याच्या तटबंदी श्रीशिवछत्रपती व त्यांच्या कर्तबगार शिलेदारांना कुर्निसात करत आहेत.
कल्याणला दुमदुमला भेरी चौघडा, गर्जे कडकडा, शिंपिला मनोरंजनाचा सडा... उमटली पदचिन्हे दारात, प्रकटली दर्याभवानी साक्षात, उजळला रंगमंच तेजात... अशा सार्थ शब्दांत तत्कालीन ‘खांदेरी’ बेटावरचा हा सगळा थरार रंगभूमीवर आविष्कृत झाला आहे. ‘दर्याभवानी’ असे नामाभिमान या थराराला देत, साडेतीन शतकांपूर्वी ‘खांदेरी’वर घडलेल्या स्वराज्याच्या शिलेदारांच्या अथांगतेची गाथा यात सांगण्यात आली आहे.
या गाथेचा शिल्पकार, ‘खांदेरी’वर भक्कम पाय रोवलेला सुभेदार मायनाक भंडारी असला, तरी त्याच्या नेतृत्वाखाली स्वराज्यातल्या असंख्य हातांनी केलेली पराक्रमाची शर्थ या नाट्याद्वारे इतिहासाला थेट वर्तमानात आणून ठेवते. हा सगळा पट लेखक व गीतकार संदीप विचारे; तसेच रंगावृत्तीकार व दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्या सक्षम हातांकरवी रंगमंचावर दृगोच्चर झाला आहे.
मुंबईहून अलिबागला समुद्रमार्गे प्रवास करताना, ‘खांदेरी’ हा जलदुर्ग लक्ष वेधून घेतो. श्रीशिवछत्रपतींच्या मावळ्यांनी हे बेट इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले. हा पराक्रम गाजवताना, इंग्रज विरुद्ध मराठे असे सागरी युद्ध झडले. ही शौर्यगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ‘दर्याभवानी’चा घाट घालण्यात आल्याचे या नाट्यातून स्पष्ट होत जाते. तब्बल चाळीस कलाकारांच्या संचात घडणाºया या आविष्कारात नाट्य व नृत्य यांचा मिलाफ साधण्यात आला आहे.
महाराष्ट्रातले किल्ले म्हटले की रायगड, राजगड, शिवनेरी अशी नावे सर्वसाधारणपणे ओठांवर येतात; मात्र संदीप विचारे यांनी या महानाट्याचे लेखन करताना, ‘खांदेरी’ किल्ला निवडला आणि त्यांची ही निवड सार्थ असण्यावर हे नाट्य मोहोर उमटवते. या नाट्याच्या निमित्ताने ‘खांदेरी’चे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. या कथेचा गाभा मर्यादित असला, तरी त्याला असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला सलाम करत त्यांनी हे संहितालेखन केल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने लेखक व रंगावृत्तीकार यांच्या परिश्रमांना दाद द्यावी लागेल.
एवढा सगळा थाट रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात उभा करायचा हे सोपे काम नाही. दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी संहितेला प्रमाण मानत हे नाट्य उभे केल्याने, ऐतिहासिक कथानकात दिसणारा चाकोरीबद्ध बडेजाव टाळला गेला आहे. ‘खांदेरी’चे महत्त्व आणि मराठा आरमाराची कर्तबगारी पटवून देण्याकडे त्यांनी लक्ष पुरवल्याने, या नाट्यामागचा मूळ हेतू साध्य झाला आहे. हे समूहनाट्य असल्याने, कुणा एकावर या नाटकाची सारी भिस्त येऊन पडलेली नाही.
तरीही, युद्धजन्य काळात अथक परिश्रमाने ज्याच्या नेतृत्वाखाली ‘खांदेरी’ची तटबंदी उभी राहिली, तो सुभेदार मायनाक भंडारी याच्याकडे या कथेचे नायकत्व जाते. ही भूमिका रोहित मावळे याने त्याच्यातल्या नेतृत्वगुणांचे दर्शन घडवत टेचात उभी केली आहे. जयंत पानसे, प्रसाद वैद्य, सचिन लिमये, विकास पवार, अमेय दळवी, नीलेश पाटील, धर्मश्री धारपवार, अनुप सिंग, सूरज परब या आणि अशा अनेक हरहुन्नरी कलाकारांनी ही ‘दर्याभवानी’ सजीव केली आहे.
नाटकातल्या पात्रांची वेशभूषा व रंगभूषा यावर घेतलेले कष्ट सार्थकी लागले आहेत. नृत्यदिग्दर्शक सचिन गजमल यांच्या नृत्यरचना नाटकात फिट्ट बसल्या आहेत. मनोहर गोलांबरे यांच्या संगीताने हे नाट्य रंजक केले आहे. बेट, किल्ला, जहाज आणि समुद्राचा आभास निर्माण करण्याचे काम प्रसाद वालावलकर यांच्या नेपथ्याने व्यवस्थित केले आहे. समुद्र्रातल्या दीपस्तंभासह विविध प्रकाशझोत, शीतल तळपदे यांनी त्यांच्या प्रकाशयोजनेतून नीट पोहोचवले आहेत.