ओडिशा, आंध्र प्रदेशाला चक्रीवादळाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:40 PM2018-09-20T20:40:26+5:302018-09-20T20:49:20+5:30
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़. ते गुरुवारी मध्यरात्री दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीला पूरी ते कलिंगापट्टणम, गोपालगंज दरम्यान धडकणार आहे़.
पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़. ते गुरुवारी मध्यरात्री दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीला पूरी ते कलिंगापट्टणम, गोपालगंज दरम्यान धडकणार आहे़. याचा परिणाम पुढील तीन दिवस ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, रायलसीमा, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानपर्यंत जाणवणार असून या परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. पुढील २४ तासात राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून ते ओडिशा व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी दरम्यान मध्यरात्री धडकणार आहे़. त्यानंतर त्याचा प्रवास जमिनीवर शुक्रवारी सकाळपासून पूर्व राजस्थानच्या दिशेने सुर राहणार आहे़. या काळात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील़ २१ सप्टेंबरला सायंकाळनंतर त्याची तीव्रता कमी होऊन २२ सप्टेंबरला ते शांत होण्याची शक्यता आहे़.
या चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
राज्यात गुरुवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़.
या चक्रीवादळाचा परिणाम २४ सप्टेंबरपर्यंत जाणविणार असून राज्यात अनेक ठिकाणी पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
इशारा : २१ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २२ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.