तबलावादक रमाकांत म्हापसेकर यांचे निधन
By Admin | Published: August 6, 2016 05:24 AM2016-08-06T05:24:58+5:302016-08-06T05:24:58+5:30
प्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक पंडित रमाकांत म्हापसेकर यांचे मालाड येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक पंडित रमाकांत म्हापसेकर यांचे मालाड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कांदिवली येथील डहाणूकर स्मशानभूमीत शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात आणि मुलगी असा परिवार आहे.
म्हापसेकर गेल्या महिन्यापासून वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल होते. त्यांनी शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे अशा दिग्गजांना अनेक वर्षे वादनाची साथ दिली. २०१५ साली त्यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते पखवाजही वाजवीत.
सिने आणि शास्त्रीय संगीतात म्हापसेकर यांनी अधिराज्य गाजवले. गायिका सितारादेवी यांच्यासोबत म्हापसेकर यांनी अखंडपणे पावणेतेरा तास जुगलबंदी केली होती. सितारादेवी थकल्या, म्हापसेकरांची वाद्यावरची बोटे थकली नाहीत. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासोबतही म्हापसेकर यांनी परदेशात जवळपास १०० कार्यक्रम केले. त्यांच्या जाण्याने संगीत-वादन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत
आहे. (प्रतिनिधी)