कर्जमाफीवरून रणकंदन

By admin | Published: March 9, 2017 01:04 AM2017-03-09T01:04:53+5:302017-03-09T01:04:53+5:30

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही बुधवारी प्रचंड गदारोळ घालत सभागृहाचे कामकाज तासाभरातच बंद पाडले.

Tackling from debt waiver | कर्जमाफीवरून रणकंदन

कर्जमाफीवरून रणकंदन

Next

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही बुधवारी प्रचंड गदारोळ घालत सभागृहाचे कामकाज तासाभरातच बंद पाडले.
मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठीचा जल्लोष सुरू झालेला असताना इकडे विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य सरकारविरुद्ध एकत्र आल्याचे चित्र दिसले. तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेत ‘कर्जमाफी नाही तर कामकाज नाही’, असे बजावत घोषणाबाजी केली.
कामकाजात हे आमदार कमालीचे आक्रमक होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘कर्जमाफीच्या घोषणेशिवाय सभागृह चालू दिले जाणार नाही, असे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जबुडव्या उद्योगपतींना अभय दिले जाते, विजय मल्या लंडनमध्ये मजा करतो पण इकडे शेतकरी कर्जापायी आत्महत्या करीत आहेत. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेऊ असे मुख्यमंत्री म्हणतात, सगळे शेतकरी वर गेल्यावर कर्जमाफी देणार आहात का, असा सवाल करीत वातावरण पेटविले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, आमच्याकडे या. तुम्हाला मुख्यमंत्री करतो मग तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घ्या. फुंडकर यांनाही त्यांनी चिमटे काढले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही आमदार वेलमध्ये उतरले. काँग्रेसच्या काही आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणा सुरू केल्या. काहींनी कागदाचे तुकडे हवेत भिरकावले. या गदारोळात कामकाज आधी १५ मिनिटांसाठी आणि नंतर दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. शेवटी तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. प्रश्नोत्तराचा तास गदारोळातच आटोपला. (विशेष प्रतिनिधी)

सभागृहात गोंधळ
‘आमच्या सरकारचा कर्जमाफीला विरोध नाही पण शेतकरी नेहमीसाठी कर्जमुक्त झाला पाहिजे, यासाठीच्या उपाययोजना करण्यावर आमचा भर आहे’, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले.
पण विरोधी आणि शिवसेनेचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सभागृहात गोंधळ सुरु होता.

Web Title: Tackling from debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.