२६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी हेडलीला आरोपी करण्यास टाडा कोर्टाची परवानगी
By admin | Published: November 18, 2015 03:55 PM2015-11-18T15:55:35+5:302015-11-18T21:02:34+5:30
कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडली याला २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सहआरोपी बनवण्याची मुंबई पोलिसांची मागणी टाडा कोर्टाने मंजूर केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडलीला या हल्ल्याच्या खटल्यात सहआरोपी बनवण्याची मुंबई पोलिसांची मागणी मुंबई विशेष न्यायालयाने मंजूर केली आहे.
मुंबई हल्ल्याच्या सुनावणीसाठी हेडलीला 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे हजर करता यावे यासाठी अमेरिकी न्यायालयाकडून परवानगी मागणारे पत्र देण्याची विनंती मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने हेडलीविरोधात समन्स जारी करत १० डिसेंबर रोजी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिग'च्या माध्यमातून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
सात वर्षांपूर्वी लष्कर -ए-तयब्बाच्या दहा दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर रोजी छत्रपटी शिवाजी टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे, ताज हॉटेल यासह अनेक मुंबईतील अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६४ जण ठार झाले तर शेकडो जण जखमी झाले होते. पोलिसांनी नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले.
या हल्ल्यासाठी हेडलीने मुंबई शहराची रेकी करून हल्ल्याचा संपूर्ण कट आखला होता. अमेरिकी नागरिक असल्याचे सांगत त्याने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निवासस्थानाचे फोटो काढले तसेच तेथील सुरक्षेचा आढावाही घेतला होता.
अमेरिकेतील शिकागो कोर्टाने हेडलीला ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून तेथून मुक्त झाल्यावरही त्याच्यावर आजीवन देखरेख ठेवण्यात येणार आहे.