ताडोबा जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड; ऑनलाईन बुकींग बंद, कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:40 PM2023-08-28T14:40:46+5:302023-08-28T14:41:32+5:30

ऑनलाईन बुकींगची जबाबदारी असलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीवर १२ कोटींच्या फसवणुकीचा वन खात्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे.

Tadoba Tiger Reserve :Online booking of Tadoba Andhari tiger project closed for Christmas, New Year court order | ताडोबा जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड; ऑनलाईन बुकींग बंद, कोर्टाचे आदेश

ताडोबा जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड; ऑनलाईन बुकींग बंद, कोर्टाचे आदेश

googlenewsNext

चंद्रपूर – यंदाच्या वर्षी तुम्ही दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीच्या निमित्ताने ताडोबा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारी करण्याचा बेत करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन बुकींगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकींग बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच्या सुटीतील बुकींग काळावर याचा परिणाम होणार आहे. सफारी बुकींग बंद असल्याने पर्यटन व्यवसायालाही त्याचा फटका बसणार आहे. रिसोर्ट बुकींग, जिप्सी बुकींग, टॅक्सी बुकींग सर्वच ठप्प झाले आहे.

ऑनलाईन बुकींगची जबाबदारी असलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीवर १२ कोटींच्या फसवणुकीचा वन खात्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. यावर तोडगा निघेपर्यंत बुकींगच बंद ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे चंद्रपूरातील व्यावसियाकांची चिंता वाढली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे सदस्य धनंजय बापट म्हणाले की, ३ ऑगस्ट रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बुकींग थांबवत आहोत असं जाहीर केले. त्यानंतर हा सगळा वाद कोर्टात गेला. ख्रिसमसच्या काळात परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. आता ही ऑनलाईन बुकींग बंद असल्याने त्याचा फटका पर्यटनाला बसणार आहे. हा वाद लवकरात लवकर निवळावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. परंतु वाद कोर्टात असल्याने कधीपर्यंत हा निकाल लागेल हे सांगता येत नाही असं त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची तब्बल १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डब्ल्यूसीएस कंपनीचे अभिषेक विनोदकुमार ठाकूर, रोहितकुमार विनोदसिंग ठाकूर (दोघेही रा. प्लॉट क्र. ६४, गुरुद्वारारोड, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

दि. १० डिसेंबर २०२१ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाइन बुकिंग करण्याकरिता रोहितकुमार ठाकूर यांच्या चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्यादरम्यान पाच वर्षांसाठी कायदेशीर करार झाला आहे. परंतु संस्थेच्या पार्टनर्सने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याची बाब ताडोबा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आली. याआधारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर (टीएटीआर)ने सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षांचे ऑडिट केले. त्या ऑडिट अहवालानुसार नमूद कालावधीमध्ये आरोपीत कंपनी / संस्थेने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांना २२ कोटी ८० लाख ६७ हजार ७४९ देणे होते. त्यापैकी त्यांनी १० कोटी ६५ लाख १६ हजार ९१८ रुपयांचा भरणा केलेला आहे. सफारी बुकिंगची उर्वरित रक्कम १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रूपये टीएटीआरला भरणा न करता आरोपींनी शासकीय रकमेचा अपहार केला. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी सचिन उत्तम शिंदे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार केली.

Web Title: Tadoba Tiger Reserve :Online booking of Tadoba Andhari tiger project closed for Christmas, New Year court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.