मराठमोळ्या आमीरची मराठीसाठी तुफान बॅटिंग
By admin | Published: August 14, 2014 01:42 AM2014-08-14T01:42:36+5:302014-08-14T14:50:05+5:30
मराठी या विषयावर राजकारणासह समाजकारण ढवळून निघत असताना प्रख्यात सिनेअभिनेता आमीर खाननेदेखील मराठीसाठी तुफान बॅटिंग केली आहे
मुंबई : मराठी या विषयावर राजकारणासह समाजकारण ढवळून निघत असताना प्रख्यात सिनेअभिनेता आमीर खाननेदेखील मराठीसाठी तुफान बॅटिंग केली आहे. मराठीच्या वाढीसाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याबद्दल आमीरने राज्य सरकारसह मुंबई विद्यापीठाचे कान टोचले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभाग आणि ग्रंथालीच्या संयुक्त विद्यमाने ‘माय मराठी’ या संभाषणात्मक मराठी-१चे प्रकाशन आमीर खानच्या हस्ते झाले. त्या वेळी मराठमोळ्या भाषणात आमीर बोलत होता.
विद्यापीठाच्या जर्मन विभागाने चांगला उपक्रम राबवला असून त्यात छोटा हातभार लावल्याचे तो म्हणाला. हे पुस्तक जगभरात मराठी शिकणाऱ्यांसाठी एक पर्वणी असेल. मात्र, जर्मन विभागाने राबवलेला हा उपक्रम राज्य सरकारकडून किंवा विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून का राबवण्यात आला नाही, असे म्हणत आमीरने सरकारसह विद्यापीठाचे कान टोचले.
या सीरिजमधील अजून ५ पुस्तके बाकी असून त्यासाठी तरी राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घ्यावा, असे सांगून आमीर मोकळा झाला. मी अनेक वर्षांपासून सुहास लिमये यांच्याकडे मराठी शिकत आहे. मराठी ही राज्यभाषा असल्याने महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठीतच बोलायला हवे.
मला मराठी न येणे ही माझ्यासाठी शरमेची गोष्ट होती. मात्र, आता त्यावर मात केल्याचेही तो म्हणाला. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, जर्मनचे कॉन्सुल जनरल मायकेल झिबर्ट, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. नरेशचंद्र, सुहास लिमये, विभा सुराणा उपस्थित होते.
या पुस्तकाच्या निर्मितीत लेखक सुहास लिमये, दिवंगत जयवंत चुनेकर, गिरिजा गोंधळेकर, रूपा
पुजारी, समन्वयक दीपक पवार, गिरिजा सावंत-टिळक, मानसी सावंत, कृत्तिका भोसले, माधुरी पुरंदरे, प्र. ना. परांजपे, सोनाली गुजर, मेहेर भूत, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, नीलेश गुप्ता यांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)