तैवानचे लक्ष आता महाराष्ट्राकडे..!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 12:44 PM2023-10-08T12:44:34+5:302023-10-08T12:46:27+5:30
भारत आणि तैवान या दोन देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून व्यापार संबंध आहेत. ‘आयटी’ या शब्दातला ‘आय ‘म्हणजे इंडिया आणि ‘टी’ म्हणजे तैवान, इतक्या आत्मीयतेने तैवान भारताकडे पाहतो. नुकतेच मुंबईत तैवान एक्स्पोचे आयोजन झाले. यासाठी ‘तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल’चे अध्यक्ष जेम्स सी.एफ. हुआंग मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांची मनाेज गडनीस यांनी घेतलेली मुलाखत.
गेल्या पाच वर्षांपासून तैवान भारतामध्ये प्रदर्शन भरवत आहे. तैवानसाठी भारताचे महत्त्व यामुळे अधोरेखित होते. याबद्दल काय सांगाल?
२०२१ मध्ये एका जर्मन नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तैवान हा अनेक देशांशी उत्तम मैत्रीचे संबंध राखून आहे. भारताबद्दल बोलायचे तर उत्तुंग इतिहास आणि उत्तम पार्श्वभूमी हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतासोबत असलेल्या मैत्रीचा आम्हाला अभिमान आहे. भारत ही तैवानसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. इथे अनेक क्षेत्रांमध्ये विपुल संधी आहेत. मी ज्या-ज्या वेळी भारतामध्ये आलो आहे, त्या प्रत्येक वेळी मी भारतीयांच्या व्यावसायिकतेने आणि सेवेने भारावून गेलो आहे. गेली ३० वर्षे ही हार्डवेअरची होती, तर आगामी ३० वर्षे सॉफ्टवेअरची आहेत. भारताने स्वीकारलेला हा मार्ग अत्यंत यथोचित आहे.
भारतासोबत काम करण्याचा गेल्या पाच वर्षांचा अनुभव कसा आहे? किती सहयोगी उद्योग सुरू झाले?
गेल्या पाच वर्षांत तैवान एक्स्पो दोन वेळा दिल्लीत झाला, तर २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये ऑनलाइन झाला. या एक्स्पोला एक लाख ३० हजार व्यावसायिकांनी भेट दिली. ६०० पेक्षा जास्त तैवानी कंपन्यांनी त्यांच्या उद्योगाची माहिती दिली, तर सहयोगी व्यवसायासाठी सहा हजार उद्योगांच्या बैठका झाल्या. याद्वारे ४०० मिलियन अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याच्या संधी उपलब्ध झाल्या.
भारतासोबत कोणत्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे ?
डिजिटल उद्योगामध्ये भारतासोबत अत्यंत जवळून काम करण्याची आमची इच्छा आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी असे आपण म्हणतो. या आयटीमधील ‘आय’ हा इंडिया असून, ‘टी’ म्हणजे तैवान असे आम्ही म्हणतो. सॉफ्टवेअर ही भारताची ताकद आहे, तर हार्डवेअर हे तैवानचे बलस्थान आहे. त्यामुळे डिजिटल युगामध्ये आयटीच्या माध्यमातून आम्ही अधिक सकस काम करू शकतो. ऊर्जा उद्योग आणि कार्बन या क्षेत्रातदेखील काम करण्याची आमची इच्छा आहे. इलेक्ट्रिक वाहने हा सध्या कळीचा मुद्दा आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीबद्दल आमच्या क्षमतेचे जगाने कौतुक केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करु.
तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख देश अशी तैवानची ओळख आहे. कोणत्या क्षेत्रात भारतासोबत काम कराल?
तंत्रज्ञानांची निर्मिती, संशोधन क्षेत्रात आम्ही भारतासोबत काम करत आहोत. भारतीय तंत्रज्ञ, संशोधक तैवानी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत, तर तैवानच्या आयसी डिझाइन हाउसने भारतामध्ये गुंतवणूक केली आहे. तैवानच्या फॉक्सकॉन, पेगाट्रॉनसारख्या दिग्गज कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. सेमी कंडक्टरसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.
तैवानच्या साउथ बाउंड धोरणाचा भारताला काय फायदा?
दक्षिणेतील व दक्षिण आशियातील देशांसोबत उद्योग, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आदी क्षेत्रात संबंध विकसित करणे हा आमच्या धोरणाचा भाग आहे. ‘तैवान एक्स्पो’ हा त्याचाच परिपाक आहे. दक्षिण आशियामध्ये चीनचे प्राबल्य आहे. मात्र, चीन आणि भारतामध्ये तितकासा व्यापार-उदीम नाही. या पार्श्वभूमीवर भारत व तैवान यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या जी-२० परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद सलमान यांनी नवीन उद्दिष्टे हाती घेतली आहेत. भारत-मध्यपूर्व युरोपियन इकोनॉमिक कॉरिडॉरसारखी महत्त्वपूर्ण उभारणी होत आहे. यामध्ये तैवान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
तैवानने मुंबईत उच्चायुक्तांचे कार्यालय सुरू केले आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कसे अधोरेखित कराल?
२०२२ या वर्षात भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. बाजारपेठेतल्या विपुल संधींमुळे जागतिक कंपन्यांसाठी भारत हे गुंतवणुकीचे आकर्षण ठरत आहे. मुंबई हे देशातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. ‘तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चर सेंटर’च्या माध्यमातून भारत आणि तैवान या दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्याचा आमचा मानस आहे. दोन्ही देशांच्या परस्परपूरक विकासाच्या संधींचा वेध घेत त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून होईल. २०१२ मध्ये चेन्नईमध्ये तैवानने कौन्सुलेट कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय सुरू झाल्यामुळे आतापर्यंत तैवानी कंपन्यांची ६० टक्के गुंतवणूक दक्षिण भारतात झालेली आहे. आता मुंबईतदेखील कार्यालय सुरू झाले. याचा परिणाम असा की, मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथेदेखील तैवानी कंपन्या गुंतवणुकीसाठी प्राधान्य देऊ शकतात.