६० जागा घ्या, नाहीतर घरी जा!
By admin | Published: January 22, 2017 05:08 AM2017-01-22T05:08:55+5:302017-01-22T05:08:55+5:30
‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने
- यदु जोशी, मुंबई
‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने शनिवारची युतीच्या बोलणीची बैठक निष्फळच ठरली नाही, तर युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली.
ही बैठक चहापाण्यासह केवळ २० मिनिटे चालली. भाजपाचे नेते ११४ जागांची यादी घेऊनच गेले होते. तथापि, शिवसेनेने केवळ साठच जागा देऊ केल्याने यादी न देताच बैठक आटोपली. ‘तुम्ही आमचा अपमान करायला आम्हाला बोलावले का, असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष
आ. आशिष शेलार यांनी खा. अनिल देसाई यांना केला. बैठकीत जोरदार वादावादी व खडाजंगीच झाली आणि दोन्ही पक्षांचे नेते तावातावाने बाहेर पडले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर वाट्टेल तशी टीका करायची, आमच्या पक्षाला माफियांचा म्हणायचे. हे धंदे बंद झाले नाहीत तर युती कशी होईल? तुमची ताकद पाहूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे, असे शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी शेलार यांना ठणकावल्याचे कळते. त्यावर विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनी, तुम्ही ६०वर अडणार असाल तर पुढे चर्चाच होऊ शकत नाही, असे सुनावले.
गेल्या काही वर्षांत शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद वाढली आहे, आमच्याजवळ आकडेवारीचा आधार आहे. भावनिक बोलून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, असा पलटवार शेलार यांनी केल्याचेही समजते. बैठकीतून बाहेर पडलेले खा. अनिल देसाई आणि शेलार यांनी सांगितले की, बैठकीतील चर्चेची माहिती आम्ही वरिष्ठ नेत्यांना देऊ आणि तेच काय तो निर्णय घेतील. त्यामुळे युतीचा चेंडू पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.
शिवसेनेचा यू टर्न, पण चर्चेत ताठर
‘युतीबाबत चर्चा होणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच काय ते जाहीर करावे,’ अशी भूमिका आ. अनिल परब यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. या भूमिकेवर शिवसेनेने काही तासांतच ‘यू टर्न’ घेत चर्चेची तयारी दर्शविली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री फोनवर चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा बोलणी सुरू करावी, असे ठरले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून विनोद तावडे यांनी खा. देसाई यांना आज दुपारी फोन केला आणि ‘रंगशारदा’मध्ये चर्चेला बसण्याचे ठरले. चर्चेबाबत ‘यू टर्न’ घेणाऱ्या शिवसेनेने भाजपाला जागा सोडण्याबाबत मात्र ताठरपणा कायम ठेवला.
नेमके काय बिघडले?
२०१२च्या महापालिका निवडणूक निकालाच्या आधारे जागांचे वाटप व्हावे, असे सेनेला वाटते. भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे असे आहे की, तेव्हा युती होती. त्यामुळे ते दोघांचे एकत्रित यश होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत दोघे वेगळे लढल्याने दोघांची वेगवेगळी ताकद कळलेली आहे. त्यामुळे आता युती करायची असेल तर विधानसभेचा आधार घ्या. सेनेच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपावाले आम्हाला आमच्याकडील विद्यमान ४० जागा मागत आहेत, त्या देणे शक्यच नाही.