‘त्या’ प्रकरणातील आरोपीवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 01:29 AM2016-10-19T01:29:34+5:302016-10-19T01:29:34+5:30
कटफळ (ता. बारामती) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुनाची धमकी देणारा आरोपी संतोष कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे.
बारामती : कटफळ (ता. बारामती) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुनाची धमकी देणारा आरोपी संतोष कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला जामीन मंजूर न करता कठोर शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज करण्यात आली. यानिमित्ताने महासंघासह विविध संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढला. महासंघाच्या या आंदोलनाला विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.
नराधम आरोपी संतोष भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यावर यापूर्वीच कठोर कारवाई केली असती, तर अल्पवयीन मुलीवर हा प्र्रसंग ओढवला नसता. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर न करता कठोर शिक्षा द्यावी. पोलिसांनी तपासात कोणतीही कुचराई करू नये; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यकांत गवळी, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. आनंद गवळी, संघटक सुदाम लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गोरख ननवरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ पोटे, महिला प्रदेशाध्यक्ष सरोज भिसुरे, जिल्हा युवक अध्यक्ष विकास तिखे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा तिखे, बारामती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, संतोष आगवणे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे म्हणाले, की अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार केलेल्या सराईत आरोपीला कठोर शिक्षा करावी; अन्यथा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. या वेळी दलित विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष सुजय रणदिवे, शरद सोनवणे, संजय गायकवाड आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आरोपीला जामीन देऊ नये. आरोपीने केलेला गुन्हा समाजाला काळिमा फासणारा आहे. त्याला कडक शासन झाले पाहिजे, अशी सर्व दलित, आंबेडकरी विचारांच्या बांधवांची मागणी आहे. (वार्ताहर)
>याशिवाय, या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने पोलिसांनी अटक केली. त्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा उजाळली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना कोणत्याही त्रुटी ठेवू नयेत. आरोपी सराईत आहे; त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी केली. कोणत्याही मुलीवर, महिलांवर अन्याय-अत्याचार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत.