पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 08:08 PM2018-06-24T20:08:12+5:302018-06-24T20:11:39+5:30
पालघर जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांकडे दुर्लक्ष करून खोट्या गुन्ह्यांखाली पत्रकारांना अटक केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
मुंबई - पालघर जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांकडे दुर्लक्ष करून खोट्या गुन्ह्यांखाली पत्रकारांना अटक केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, वाघोबा खिंडीतील गोळीबार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालघर पोलीस ठाण्यात गेलेले पत्रकार हुसेन खान आणि राम परमार यांच्याविरूद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आली व त्यांना तातडीने अटकही करण्यात आली. या पत्रकारांविरूद् पोलीस उपनिरीक्षक सैय्यद यांची कॉलर पकडल्याचा आरोप आहे. मात्र, पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असताना या घटनेची चित्रफित उपलब्ध करून देण्यास पोलीस सबब सांगून नकार देत आहेत.
पोलिसांना गोळीबार करावा लागतो, इतकी गंभीर घटना घडली असताना त्यासंदर्भातील गुन्हे नंतर दाखल करण्यात आले. परंतु, या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर अनावश्यक तत्परता दाखवून अगोदर गुन्हे दाखल करण्यात आले, याकडेही विखे पाटील यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याकडेही दाद मागितली. परंतु, त्यांनी या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याऐवजी पत्रकारांनाच धाकदपटशा दाखविल्याचा आरोप असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावे आणि केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याविरूद्ध देखील कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.