‘राज ठाकरेंवर कारवाई करा’ - रामदास आठवले
By admin | Published: March 11, 2016 02:46 AM2016-03-11T02:46:14+5:302016-03-11T02:46:14+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत हिंसक भाषा खपवून घेणार नाही. गोरगरीबांच्या रिक्षा जाळण्याचे मनसुभे उधळून लावू, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला. तर, प्रक्षोभक भाषणाबद्दल राज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. मराठी माणसाला न्याय मिळायला हवा. मात्र, घटनेने सर्वांना रोजगाराचा अधिकार दिला आहे. प्रांतवादातून गोरगोरिबांच्या रिक्षा जाळण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. राज्य सरकारनेही अशी हिंसक भाषा खपवून घेऊ नये, असे आवाहन आठवले यांनी केले.
नव्या परमिटच्या रिक्षा जाळण्याची भाषा समाजात दुही माजवणारी आहे. राज्याची शांतता भंग करणारे व अनुचित प्रकारांना उत्तेजन देणाऱ्या व्यक्तव्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले. भूमिपुत्रांना रोजगार मिळायला हवा. हिंसक भाषा करणा-या राज ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली. (प्रतिनिधी)काळे फासले
मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी भाजपा आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयाबाहेरील पोस्टर्स फाडून त्याला काळे फासले. ‘राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा जाळून दाखवावी, मग कार्यकर्त्यांना सांगावे’, असे वक्तव्य सागर यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यानी हे पाऊल उचलल्याचे आमदार योगेश सागर यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून सागर यांच्या कार्यालयाबाहेरील पोस्टर्स फाडून त्याला काळे फासले व प्रतिकात्मक पुतळा जाळला.