संत विचारधारेविरोधात वक्तव्य करणाऱ्याविरूध्द कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 09:17 PM2018-07-19T21:17:07+5:302018-07-19T21:21:35+5:30
समाजआरतीमध्ये ठराव; वारकरी सांप्रदायात प्रचंड नाराजी
वेळापूर - आषाढी पौर्णिमेनिमित्त विठ्ठलाची वारी सुरू असून या काळात वारकरी संप्रदाय विरुद्ध वक्तव्य करण्याचा प्रकार घडत आहे. याची गंभीर दखल वारकरी संप्रदायाने घेतली आहे. गुरूवारी वेळापूर येथे झालेल्या समाजआरती मध्ये यासंदर्भात एक ठराव घेऊन अशा व्यक्तींवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये दोन दिवसापूर्वी वारकरी संप्रदाय आणि संताविरुद्ध वक्तव्य करण्याचा प्रकार घडला होता. त्याचे तीव्र पडसाद लगेचच उमटल्यावर माफी मागून हा प्रकार निवळण्यात आला होता. एवढेच नाही तर, पुणे मुक्कामी भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. त्याचे तीव्र पडसाद समाजमनात उमटले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार व्हायला लागल्याने गंभीर दखल वारकरी संप्रदायाने घेतली आहे. वारकरी सांप्रदाय हा समताप्रधान आहे. जात , धर्म , पंथ याच्या पलिकडे जावून स्त्रीयांना सुध्दा अध्यात्मिक स्वातंत्र्य देत मानवतेची बीजे जनमानसात रुजविणारा आहे. हे सर्वज्ञात असून सुध्दा काही व्यक्तींकडून त्याचा विपर्यास करणारी विधाने गेल्या काही दिवसापासून होत असल्याची खंत गुरुवारी झालेल्या समाजआरतीत व्यक्त करण्यात आली. अशा प्रवृत्तीना पायबंध घालण्याची मागणी वारकरयांकडून आल्याने वारकरी सांप्रदायाने गंभीर दखल घेतली आहे . संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील समाज आरतीच्या वेळी झालेल्या ठरावात, संत आणि संत विचार या संदर्भात विपर्यस्त तसेच अवमानकारक लेखन , वक्तव्य करण्याचे प्रकार अलीकडील काळात वारंवार घडत असल्याने असे प्रकार करणाऱ्याना परिणामकारक शासन घडेल अशा प्रकारची कारवाई शासनाने करावी अशी मागणी समस्त पालखी सोहळ्यातील समाज व वारकरी सांप्रदायाच्या वतीने समाज आरतीच्या वेळी करण्यात आली आहे. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे अध्यक्ष डॉ अभय टिळक, विश्वस्थ अजित कुलकर्णी, सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, श्रीमंत शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी, नामदेव महाराज वासकर, राणु महाराज वासकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती कोकाटे, वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांच्यासह मानकरी, दिंडी प्रमुख व लाखो वारकरी उपस्थित होते.