‘त्या’ सात मंत्र्यांवर कारवाई करा
By Admin | Published: June 5, 2016 01:24 AM2016-06-05T01:24:45+5:302016-06-05T01:24:45+5:30
एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत
मुंबई : एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. या सातही मंत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी घुसू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.
भ्रष्ट मंत्र्यांवरील कारवाई आणि मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी बोलताना निरुपम म्हणाले की, ‘एकनाथ खडसे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. मोक्का कायद्यांतर्गत, तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करावी. या सरकारमधील ७ मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, दीपक सावंत, रणजीत पाटील, बबनराव लोणीकर आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय मी व काँग्रेस गप्प बसणार नाही. (प्रतिनिधी)
...अन् पालिकेने हटविले १२०० झेंडे
- धिक्कार मोर्चासाठी काँग्रेसने फॅशन स्ट्रिट ते आझाद मैदान परिसरात सुमारे १२०० काँगे्रसचे झेंडे लावले होते. रस्ता दुभाजक, फुटपाथवरील विजेचे खांब आदींवर झेंडे लावले गेले. मात्र, मोर्चा सुरू होण्याच्या आधीच महापालिका अधिकाऱ्यांनी हे झेंडे हटविण्याची कार्यवाही केली. त्यामुळे नाराज काँग्रेस कार्यकर्ते हेच झेंडे हातात घेत, मोर्च्यात सहभागी झाले.
- काँग्रेसच्या मोर्चाला शिवसेना-भाजपा घाबरली आहे. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत झेंडे हटविण्याचा प्रकार करण्यात आला. मात्र, या अशा प्रकारांनी काँग्रेस दबणार नाही, पालिकेच्या विरोधातील आमचा लढा सुरूच राहील, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
युतीवर आरोप
मुंबई महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. नालेसफाई घोटाळा, टॅब घोटाळा, रस्ते बांधणी घोटाळा, खड्डे दुरुस्ती घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा असे अनेक घोटाळे झालेले आहेत. भाजपाचेच खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत माफिया राज सुरू असल्याचे म्हटले होते.
माफिया राजला वांद्र्याचे एक साहेब त्यांचा मेहुणा व त्यांचाच खासगी सचिव जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते. आता सोमय्या यांनी त्यांची नावे जाहीर करावीत व त्यांच्यावर कारवाई करून अटक करावी, अशी आमची मागणी आहे, शिवाय महापालिका चालविण्यात शिवसेना-भाजपा अपयशी ठरली असल्याने, महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.