विकासाच्या संधीचा ’बिल्लवा’ने लाभ घ्यावा
By Admin | Published: June 13, 2016 02:46 AM2016-06-13T02:46:27+5:302016-06-13T02:46:27+5:30
भारत देश जगात एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या आर्थिक विकासदरात झपाट्याने प्रगती होत आहे.
मुंबई : भारत देश जगात एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला येत आहे. भारताच्या आर्थिक विकासदरात झपाट्याने प्रगती होत आहे. विकासाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. याचा बिल्लवा समुदायाने लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.
बिल्लवा चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी बिल्लवा चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन एन. टी. पुजारी, भारत को-आॅप. बँकेचे चेअरमन जय सी. सुवर्ण, अखिल भारत बिल्लवा युनियनचे अध्यक्ष नवीनचंद्र्र सुवर्ण आदी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, की मुंबईच्या विकासात बिल्लवा समुदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या विकासात ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांची ती आहे. बिल्लवा समुदायाने महाराष्ट्राच्या विकासातही योगदान द्यावे. स्थानिक भाषांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. बिल्लवा समुदायाने तुळू भाषेचे आणि संस्कृतीचे जतन करावे, असेही ते म्हणाले.
विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल रोहिणी सालियन, रमेश कुमार, जयराम बन्नन, राजशेखर कोटियान, सूर्यप्रकाश आदी मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते याप्रसंगी सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)