सगळेच पैसे घरीच न्या; टोलचे एवढे कलेक्शन की, अख्ख्या राज्यातील रस्ते सिमेंटचे होतील: शर्मिला ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:57 PM2023-11-01T14:57:57+5:302023-11-01T14:58:36+5:30
आम्ही कोकणची जागर यात्रा केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले. मात्र, एक मार्ग पूर्ण झाला नाही. काम सुरू असतानाच एक पूल कोसळला. पूल पूर्ण झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील? शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका.
एकीकडे मराठा आंदोलनामुळे राज्यातील सर्व प्रश्न बाजुला पडलेले असताना दुसरीकडे मनसेने पुन्हा उचललेला टोलचा मुद्दादेखील मागे पडत चालला होता. सध्या मुंबईतील सर्व प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर मनसेने कॅमेरे लावले असून त्याद्वारे ये-जा करणाऱ्या गाड्यांची मोजदाद केली जात आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही 15 दिवस सीसीटीव्ही माध्यमातून किती वाहने शहरात प्रवेश करतात, याची पाहणी करणार आहोत. दिवसाला दहिसर टोल वरून लाख गाड्या पास होतात. पाच मुख्य प्रवेशद्वारावरील जे टोलचे कलेक्शन आहे, त्यातून अख्ख्या महाराष्ट्राचे रस्ते काँक्रीटचे होतील. राज्यकर्त्यांच्या मनात आलं तर ते करू शकतात. पण ते करत नाहीत, असा आरोप ठाकरे यांनी केला.
आम्ही कोकणची जागर यात्रा केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले. मात्र, एक मार्ग पूर्ण झाला नाही. काम सुरू असतानाच एक पूल कोसळला. पूल पूर्ण झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील? कशासाठी ही कामे करतात? सगळेच पैसे घरी न्या, टॅक्स पेअरच्या पैशाचा हा अपव्यय आहे, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली.
मराठा आरक्षणावर काल राज ठाकरेंनी भूमिका सांगितली आहे. आमचे अजूनही असे म्हणणे आहे की, आर्थिक दृष्ट्या जे गरीब आहेत, ज्यांना शिक्षणाची सोय नाही, बाळासाहेबांच्या काळापासून आम्ही हेच सांगतोय. बाळासाहेब सुद्धा म्हणायचे मी जातीपाती मानत नाही. प्रत्येक जातीला पोट असते आणि प्रत्येक जातीच्या मुलाला चांगल्या शाळा हव्या असतात. शिक्षणाची सोय हवी असते जो इकॉनोमिकली गरीब आहे, त्याला प्रत्येकाला आरक्षण द्या, असे त्या म्हणाल्या.