दक्षता घ्या, हृदयविकार टाळा!
By admin | Published: September 26, 2016 02:44 AM2016-09-26T02:44:03+5:302016-09-26T02:44:03+5:30
तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आता कोणत्याही वयोगटात होत
मुंबई: तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आता कोणत्याही वयोगटात होत असल्याने ही चिंतेची बाब झाल्याने उच्च रक्तदाब, आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास ९० टक्क्यांनी मुधेमह होण्याचा धोका घटतो, असे मत मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञांनी बॉम्बे रुग्णालयात आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त केले.
२९ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘हृदय दिना’निमित्त बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (ग्रेटर मुंबई) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई शाखेच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकारांवर परिसंवादाचे आयोजन केले होते.
या परिषदेत बॉम्बे रुग्णालयाचे महासंचालक आणि ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेखा पाठक, डॉ. राजेंद्र त्रिवेदी, डॉ. अनिल शर्मा, डॉ. सुहास पिंगळे, डॉ. ब्रायन पिंटो, डॉ. आशिष नाबर डॉ. बी. सी. कलमठ सहभागी झाले होते. या परिषदेत एका ६५ वर्षीय महिला रुग्णाची अॅन्जिओप्लास्टीचे थेट प्रक्षेपण सभागृहात दाखवण्यात आले.
हृदयविकार टाळणे अवघड नाही. मात्र, काही गोष्टी या नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी मधुमेह, रक्तदाब, एलडीएल कोलेस्ट्रॉल, मद्यपान आणि धूम्रपान नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकाराचा धोका नव्वद टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते, असे मत डॉ. ब्रायन पिंटो यांनी व्यक्त केले.
डॉ. बी. के. गोयल यांनी या परिषदेत, हृदयविकार उपचारांची सुरुवात कशी आणि कुठून झाली, या उपचारांमध्ये आलेली स्थित्यंतर, महत्त्वाचे टप्पे कोणते आणि त्याचा रुग्णांना कसा फायदा झाला, याविषयी माहिती दिली.
हृदयविकार काही प्रमाणात अनुवंशिकही आहे. ज्यांच्या आई-वडिलांना ५५ वर्षांआधीच हृदयविकाराचा झटका आला असेल, अशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी नियमित आपली तपासणी करून घेतली पाहिजे, असे बॉम्बे रुग्णालयाचे हृदयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. बी. सी. कलमठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)