कर्करोग रुग्णांचा असा करा सांभाळ, टाटा मेमोरिअल देणार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:04 AM2018-01-06T05:04:25+5:302018-01-06T05:05:05+5:30
टाटा मेमोरिअल सेंटरने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने एक वर्षाचा संपूर्ण वेळ असलेला ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन’ (केइव्हॅट) हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. रुग्णसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच कर्करोग रुग्णांची गरज ओळखून या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
मुंबई - टाटा मेमोरिअल सेंटरने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने एक वर्षाचा संपूर्ण वेळ असलेला ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन’ (केइव्हॅट) हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. रुग्णसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच कर्करोग रुग्णांची गरज ओळखून या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या रुग्णांची सेवा कशी करावी, त्यांचा सांभाळ कसा करावा, याचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे देण्यात येणार आहे.
टाटा मेमोरिअलच्या वर्धापन दिनी २८ फेब्रुवारी रोजी या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच या माध्यमातून काळजीवाहकांना (केअरगिव्हर्स) व्यावसायिक पातळीचे प्रशिक्षण देण्यात येईल. आरोग्य सेवा क्षेत्रातील रुग्णांची निदान प्रक्रिया, उपचार पर्याय आणि उपलब्ध स्रोत या सर्व टप्प्यांवरील प्रशिक्षण काळजीवाहकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्याच्या प्रक्रियेत समुपदेशन, आर्थिक पाठबळ यासाठीही हे काळजीवाहक मार्गदर्शन करतील.
हा अभ्यासक्रम केवळ टाटा मेमोरिअलपुरता मर्यादित नसून या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील ‘पेशंट नेव्हीगेशन प्रोग्राम अॅप्लिकेशन’ तयार करण्याचा विचार आहे. जेणेकरून या काळजीवाहकांची फळी तयार होऊन देशभरातील रुग्णालये व संस्थांमध्ये कार्यरत होईल. या माध्यमातून रुग्णसेवा क्षेत्रात नवा पायंडा पाडून कर्करोग रुग्णांचे आयुष्य अधिकाधिक सुकर करण्याचा प्रयत्न आहे.
- हा प्रशिक्षण अभ्यासक्रम रुग्ण आणि काळजीवाहक यांच्यातील दुवा ठरेल.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ, प्राध्यापक प्रशिक्षण देतील.
- टाटा मेमोरिअलमध्ये सहा महिन्यांचा इंटर्नशिप कालावधी
- अन्य रुग्णालये व संस्थांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न