फटाके फोडताना घ्या काळजी
By admin | Published: October 31, 2016 02:02 AM2016-10-31T02:02:28+5:302016-10-31T02:02:28+5:30
शोभेच्या, रंगीबेरंगी आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजी होत आहे.
मुंबई: शहरासह उपनगरांत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. शोभेच्या, रंगीबेरंगी आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजी होत आहे. पण, विषारी घटक असलेल्या फटाक्यांचा फटका फक्त माणसांनाच नाही तर प्राणी-पक्ष्यांनाही बसत आहे. दिवाळीच्या दोन दिवसांत १५ पक्षी आणि ५ प्राणी उपचारासाठी बैल-घोडा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती रुग्णालयाचे सचिव डॉ. जे.सी. खन्ना यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांत रुग्णालयात एकूण १५ पक्षी दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कबुतरांचा समावेश आहे. एक घार आणि दोन ते तीन पोपटही रुग्णालयात दाखल झाले आहेत. या पक्ष्यांना फटाक्यातील विषारी घटकांचा त्रास झालेला आहे. शहरातील विविध भागांमध्ये हे पक्षी निपचित पडलेल्या अवस्थेत आढळले. फटाक्यांमधील विषारी घटकांचा परिणाम या पक्ष्यांवर झाल्याचे दिसून आले आहे. कबूतरखान्याजवळ फटाके फोडल्यास कबुतरांना अधिक त्रास होतो. पण, या पक्ष्यांना गंभीर जखमा झालेल्या नाहीत. चार कुत्र्यांना आणि एका मांजराला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांनाही गंभीर फटाक्यांमुळे जखमा झालेल्या नाहीत. पण, त्यांना फटाक्यांमुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत शोभेच्या आणि रंगांच्या फटाक्यांची मागणी वाढली आहे. पण, यामुळे प्रदूषणातही वाढ होताना दिसत आहे. माणसांप्रमाणेच पक्ष्यांना याचा त्रास होतो. अनेक पक्ष्यांच्या शरीरात विषारी वायू गेल्यामुळे ते अशक्त होतात. त्यांना उडता येत नाही. तर, काही पक्ष्यांना श्वसनाचा त्रास उद्भवतो. पण, हा त्रास फक्त शारीरिक असतो. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळाल्यास ते तीन ते चार
दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होऊ शकतात, असे डॉ. खन्ना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>अशी खबरदारी घ्या!
फटाके उडवताना जवळ प्राणी -पक्षी आहेत का पहा.
पक्षी-प्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे न्या, अथवा प्राणिमित्रांना माहिती द्या
पाळीव प्राण्यांना सायंकाळी अथवा रात्री उशिरा खायला द्या. फटाक्यांच्या आवाजामुळे प्राणी घाबरून खात नाहीत.
प्राण्यांच्या अंगावर फटाके फोडू नका, मोठा आवाज करणारे तसेच रंगीबेरंगी फटाके कमी उडवा.