तब्येतीची काळजी घ्या! पवारांचा भुजबळांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:54 AM2018-05-12T03:54:51+5:302018-05-12T03:54:51+5:30
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत प्रकृती संदर्भात चर्चा झाली. पवार यांनी विशेष काळजी घ्या, असे सांगितल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
जामिनावर सुटल्यानंतर केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भुजबळांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, आज भुजबळांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल दोन वर्षांनंतर भुजबळ-पवार भेट होणार असल्याने, राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या वेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत, भुजबळांनी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. मात्र, पवारांनी वडीलकीच्या नात्याने तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचे भुजबळांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवार यांचा आला होता, असे भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्याचबरोबर, शिवसेनेचेही आभार मानले होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ-पवार भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंकाळी भुजबळ यांची भेट घेतली़