प्रवाशांची काळजी घ्या, अन्यथा कारवाई! ST प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये...
By सचिन देव | Published: August 21, 2023 12:30 PM2023-08-21T12:30:58+5:302023-08-21T12:31:23+5:30
एस. टी.च्या महाव्यवस्थापकांंची राज्यभरातील विभाग नियंत्रकांना तंबी
सचिन देव, लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे: प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी एसटीच्या सर्व बसेसला वायपर, हेड लाइट्स, तसेच इतर तांत्रिक कामे पूर्ण करून बसेस सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असताना अधिकाऱ्यांकडून दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याची बाब महामंडळाच्या महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही दिली आहे.
एस. टी. महामंडळाच्या यांत्रिक विभागाचे महाव्यवस्थापक नं. शि. कोलारकर यांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पावसाळ्याच्या आधी विभाग नियंत्रकांनी व यंत्र अभियंता यांनी त्यांच्या विभागातील प्रत्येक बसेसला वायपर बसवून घ्यावेत, तसेच हेड लाइट्स, साईट मिरर, गळक्या बसेसची दुरुस्ती, आदी तांत्रिक कामे तातडीने करण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, या सूचनांचे बहुतांश विभाग नियंत्रकांनी व यंत्र अभियंत्यांनी आपल्या विभागामध्ये पालन केलेले दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांकडून थेट वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून बसेस सुस्थितीत ठेवण्याबाबत सूचना करूनही, अधिकारी सूचनांचे पालन करीत नसतील, तर ही बाब अति गंभीर स्वरुपाची आहे. अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा आल्या, तर या तक्रारींची एस. टी. महामंडळाकडून गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.