ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- 'नेमेचि येतो मग पावसाळा' या म्हणीप्रमाणे वाट बघत असलेल्या पावसाची महाराष्ट्रातील काही भागात चांगलीच सुरुवात झाली आहे. पावसासोबत रोगराई येणार असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागणार आहेत.
आरोग्याच्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं आहे. कारण पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणून आम्ही यंदाच्या पावसाळ्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, यासंदर्भात माहिती देत आहोत.
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी.
- पावसात भिजणे शक्यतो टाळा आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलनं अंग पुसून घ्या
- ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहू देऊ नका
- पावसातून बाहेरून घरात आल्यावर आधी पाय स्वच्छ कोरडे करावेत. तसेच ओले मोजे वापरू नयेत.
- पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करून मगच कोरडे कपडे घालावेत.
- अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो.
- केस व कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्यता असते.
- डास निर्मूलनासाठी विविध उपाययोजना कराव्यात.
- नियमितपणे अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे.
आहारविषयक घ्यावयाची काळजी...
- भेळपुरी, पाणीपुरी, भजी, सॅंडविच इत्यादी बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- बर्फाचा गोळा, रस्त्यावर मिळणारे फळांचे रस आणि कुल्फी असे पदार्थ टाळावेत.
- तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
- मांसाहार करणाऱ्यांनी या काळामध्ये मासे खाणे टाळावे, कारण हा माशांचा प्रजोत्पादनाचा मोसम असतो, त्यामुळे पचनसंस्थेला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
- कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्नपदार्थ आणि कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे कारण या अन्नपदार्थांमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या काळात पचनशक्ती आधीच मंद असते आणि हे अन्नपदार्थ पचायला जड असतात.
- आंबट, शीत पदार्थ टाळावेत.
- आहारामध्ये आले, गवती चहा इत्यादी पदार्थ असावेत.
- पावसाळ्यात नेहमी आरोग्यकारक, चांगले शिजवलेले आणि गरम असे घरचेच जेवण घेणे हितकारक ठरते.
- नेहमीच्या चहाऐवजी जर औषधी चहा, Green Tea घेतला तर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. कॉफीमुळे Dehyadration होत असल्यामुळे कॉफी घेणे टाळावे.
- प्यायचे पाणी शुद्ध करण्यासाठी water प्युरिफायरचा वापर करावा. ते शक्य नसल्यास पाणी गाळून उकळवून मगच पिण्यासाठी वापरावे.
- अन्नपचन नीट व्हावे, यासाठी या काळात भरपूर पाणी पिणे योग्य ठरते.
- बाहेर पाणी पिणे शक्यतो टाळावे. बाहेर पडताना नेहमी आपली पाण्याची बाटली जवळ ठेवावी.
व्यायामविषयक घ्यावयाची काळजी...
- या काळात योग्य प्रमाणात व्यायाम करणे हितावह ठरते. अजिबात व्यायाम न केल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही, तर शारीरिक बल या काळात निसर्गतः कमी असल्यामुळे अतिप्रमाणात व्यायाम केल्यास अशक्तपणा येऊ शकतो, त्यामुळे नियमित योगासने, प्राणायाम करणे, सूर्यनमस्कार घालणे अशा प्रकारचा व्यायाम करावा.
Web Title: Take care of the rainy season!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.