जपून जा रे... पुढे धोका आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 07:17 AM2024-07-07T07:17:05+5:302024-07-07T07:17:37+5:30

पावसाळ्यात लोणावळा, माळशेज घाट, आंबोली घाट अशा ठिकाणी गर्दीचा प्रचंड रेटा असतो. आतापर्यंत सह्याद्रीत, पर्यटन स्थळांवर, ओढे, तलाव, धरणे इत्यादी ठिकाणी अनेक दुर्घटना झाल्याची नोंद आहे. धबधब्याखाली खळग्यात बुडालेल्यांची संख्या मोठी आहे.

Take care to avoid accidents at Sahyadri tourist spots | जपून जा रे... पुढे धोका आहे...

जपून जा रे... पुढे धोका आहे...

राहुल मेश्राम
मुख्य समन्वयक, महाराष्ट्र माउंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर

पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की शहरातल्या गर्दीतून सुटका करुन घेण्यासाठी सर्वजण निसर्गरम्य ठिकाणी धाव घेतात. गिरीपर्यटक, पर्यटक, हौशे-नवशे अशा सर्वांची एकच झुंबड उडते. राजमाची, सिंहगड, लोहगड, कळसुबाई अशा अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने ट्रेकर्सबरोबर पर्यटक देखील येतात. मात्र, समाजमाध्यमांवर फोटो टाकण्यासाठी किंवा रील बनविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, योग्य काळजी घेतल्यास चुका टाळता येतील आणि वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येईल. 

‘ही’ स्टंटबाजी जीवावर बेतेल

डोंगरावरील अवघड वाटेने पावसाळ्यात चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भटक्यांना अपघाताला सामोरे जावे लागणे, डोंगर भटकंती करताना वाट चुकून वेगळ्याच डोंगरावर पोहोचल्याच्या किंवा रात्रभर उघड्यावर बसायला लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

ट्रेकर्स, गिरीपर्यटक, पिकनिकर्स यांनी जशी खबरदारी घ्यायला हवी तशीच काही पावले शासनाकडून उचलण्याची गरज आहे. आपल्याकडे एकूणच अपघात घडल्यानंतर होणाऱ्या चौकशीवर अधिक भर असतो आणि अपघातानंतर तातडीने पर्यटन स्थळावर बंदी घालण्याकडे कल असतो. 

त्याऐवजी शासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली तर नियमांच्या चौकटीत राहून नियंत्रित पद्धतीने पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणे शक्य होऊ शकते.

कोणत्याही पर्यटन स्थळाची एक मर्यादित वहन क्षमता (कॅरिंग कपॅसिटी : किती पर्यटकांना सामावून घेता येईल, याचे गणित) असते. त्याआधारे पर्यटक संख्येवर मर्यादा घालावी.

अपघात टाळण्यासाठी शासनाने ‘हे’ करावे

कास पठार, वन्यजीव तसेच व्याघ्र अभयारण्य येथे नोंदणी प्रक्रिया व इतर यंत्रणा दिसतात. समान तत्त्वावर गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांसाठी मर्यादित जागांसाठी पर्यटकांना शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करावे. 

संबंधित पर्यटन स्थळावर याच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, वनविभाग, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून यंत्रणा तयार करावी. प्रथमोपचार व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. 

अपघाताच्या शक्यता गृहीत धरून गिर्यारोहण संस्थांच्या माध्यमातून बचाव पथकाचे मार्गदर्शन घ्यावे. धोक्याच्या संभाव्य जागांवर लक्ष ठेवावे व तेथे प्रतिबंध करावा. 

सर्व पर्यटन स्थळांवर दारू किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांच्या सेवन आणि विक्रीवर बंदी घालण्यात यावी.

काळजी घ्या

डोंगरमाथ्यावर पाऊस वाढल्यास सहज पार करू असे वाटणारे ओढे, धबधबे धोकादायक ठरू शकतात. 

धबधब्याचे पाणी जेथे पडते तेथे तयार झालेल्या खड्ड्यात उतरू नये. तेथे भोवऱ्यामुळे त्या पाण्यातून बाहेर येणे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही अशक्य होते. 

शरीर डीहायड्रेड झाल्यामुळे दुष्परिणाम होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.

हे लक्षात ठेवा

चमूतील सदस्यांची संख्या मर्यादित असावी. प्रथमोपचार साहित्य तसेच सोबत किमान एखादा प्रशिक्षित अनुभवी आणि प्रमाणित वैद्यकीय प्रथमोपचार करणारा हवा.

ट्रेक संदर्भातील सर्व माहिती (कुठे, किती दिवस, ग्रुप कोणता, लीडर तसेच इतरांचे संपर्क क्रमांक) घरी किंवा जवळच्या व्यक्तीस द्यावी.

पायथ्याच्या गावातील स्थानिक, जवळचे हॉस्पिटल आणि पोलिस चौकी यांचे संपर्क क्रमांक न चुकता जवळ बाळगून ठेवावेत. पायथ्याच्या गावातून गाईड सोबत घ्यावा.

किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यावर चढू नये. एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.

काही दुर्घटना घडल्यास ७६२०२३०२३१ या २४x७ रेस्क्यू हेल्पलाइनवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा. पावसाळी पर्यटन हे आनंदासाठी असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा आनंद द्विगुणित होईल.
 

Web Title: Take care to avoid accidents at Sahyadri tourist spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.